सत्ता आली तर निवडणूक आयोगावरच… उद्धव ठाकरे यांचा थेट इशारा; काय म्हणाले?

इमान विकणारे खूप आहे. गुडघे टेकत आहेत. अशा लोकांना आपण पोसलं याचं मला वाईट वाटतं. आईच्या कुशीवर वार करणारे हे लोक आहेत. आपली परीक्षा सुरू आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

सत्ता आली तर निवडणूक आयोगावरच... उद्धव ठाकरे यांचा थेट इशारा; काय म्हणाले?
uddhav thackeray
| Updated on: Oct 27, 2025 | 8:09 PM

Uddhav Thackeray : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील निर्धार मेळाव्यात सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली. मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी कार्यकर्ते, पदाधिकारी यांचे मनोबल वाढवण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. काहीही झालं तरी आम्हीच मुंबई पालिका निवडणूक जिंकणार, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी मतदार याद्यात घोळ असल्याच्या आरोपाचाही पुनरुच्चार केला. गोळ्या झाडून मराठी माणूस झुकत नाही. म्हणून पैसे देऊन मुंबई विकत घेण्याचा प्रयत्न आहे, असा गंभीर आरोपही ठाकरे यांनी यावेळी केला.

भाजप म्हणजे स्वयंघोषित देशप्रेमींची बोगस टोळी

इमान विकणारे खूप आहे. गुडघे टेकत आहेत. अशा लोकांना आपण पोसलं याचं मला वाईट वाटतं. आईच्या कुशीवर वार करणारे हे लोक आहेत. आपली परीक्षा सुरू आहे. शिवसेनाप्रमुख आपली परीक्षा घेत आहेत. कितीही अमित शाह आले तरी आपली धमक हरवू देऊ नका, असे आवाहन ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना केले. निवडणूक होऊ द्यायची की नाही हे सर्वांनी मिळवून ठरवू. वाट्टेल ते करायचं. भाजप जगातील सर्वात मोठा पक्ष कसला. भाजप म्हणजे स्वयंघोषित देशप्रेमींची बोगस टोळी आहे. स्वत: देशप्रेमी असल्याचे जाहीर करतात. त्यांना मतं चोरावी लागतात. पक्ष फोडावी लागतात. हे कसले आत्म निर्भर, आहेत असा थेट हल्लाबोल यावेळी ठाकरे यांनी केला.

आमचा ईव्हीएमवरचा संशय गेलेला नाही

पुढे बोलताना त्यांनी निवडणूक आयोग आणि आयोगाची निवडणूक घेण्याची पद्धत यावर बोट ठेवले. आमचा ईव्हीएमवरचा संशय गेलेला नाही. हा संशय दूर होण्याआधीच आयोगाने सांगितलं की पालिका निवडणुकीत व्हीव्हीपॅट राहणार नाही. आम्ही काही केलं तर करप्ट प्रॅक्टिस म्हटले जाते. निवडणूक आयोगावरही करप्ट प्रॅक्टिसची केस दाखल झाली पाहिजे, अशी टीका ठाकरे यांनी केली.

सरकार आल्यावर निवडणूक आयोगावर…

निवडणूक आयोगावर गुन्हा दाखल करायला हवा. लोकसभेच्या निवडणुकीला सध्या उशीर आहे. आजचे दिवस त्यांचे असतील. उद्याचे दिवस आमचे आहेत, असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला. तसेच लोकसभेत सरकार आल्यावर निवडणूक आयोगावर खटला भरायला पाहिजे, अशी भूमिका ठाकरे यांनी व्यक्ती केली. निवडणूक आयोगाला कोर्टात न्यायलाच पाहिजे असेही ठाकरे यावेळी म्हणाले.

आता ते हिंदू मुस्लीम करतील

मनसेच्या दिपोत्सवात मी गेलो. राजने बोलावलं होतं. मराठी अमराठींची तुफान गर्दी होती. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. यात मिठ कसं घालायचं, असे म्हणत आम्ही मनसेसोबत युती करण्यास सकारात्मक आहोत, असे संकेतही उद्धव ठाकरे यांनी दिले. निवडणूक आल्यामुळे आता ते हिंदू मुस्लीम करतील. आपण मारामाऱ्या करतो. भांडण करतो. त्यावेळी हे मतचोरी करतात. हे हिंदू मुसलमान करतात तेव्हा समजायचं निवडणूक आली, अशी बोचरी टीका ठाकरेंनी केली.