
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसानं धुमाकूळ घातला आहे, पावसाचा चांगलाच तडाखा राज्याला बसला आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. ऐन हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतल्यानं शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. पावसामुळे केवळ पिकांचंच नाही तर शेतीचं देखील नुकसान झालं आहे. शेतीची माती देखील पावसाच्या पाण्याबरोबर वाहून गेली आहे.
ग्रामीण भागांमध्ये तर परिस्थिती खूपच बिकट झाली आहे, अनेक गावांना पुराच्या पाण्याचा वेढा पडला असून घरादारात पाणी घुसलं आहे, संसारोपयोगी साहित्य देखील पाण्यात वाहून गेल्यामुळे अनेकांचे संसार रस्त्यावर आले आहेत. अनेक गावांचा संर्पक तुटला आहे. याचा सर्वाधिक फटका यंदा मराठवाड्याला बसला आहे. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकसानग्रस्त भागाची पहाणी केली, यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 50 हजार रुपयांची मदत द्यावी अशी मागणी केली आहे.
नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
मराठवाड्यात पहिल्यांदाच इतकं अतिप्रचंड नुकसान झालं आहे. पंजाबमध्ये जर हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत मिळत असेल तर महाराष्ट्रात देखील हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत का देऊ शकत नाहीत? असा सवाल यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. पुढं बोलताना ते म्हणाले की, मराठवाड्यावर पहिल्यांदाच भीषण संकट आहे, सरकारची मदत ही फारच तुटपुंजी आहे. आता शेतकऱ्यांना बँकेच्या नोटीसा देखील यायला लागल्या आहेत. मात्र मी शेतकरी बांधवांना आव्हान करतो की, कोणीही आत्महत्या करायची नाही, शिवसेना तुमच्या पाठीशी आहे, जर बँकेची नोटीस आली तर ती आमच्या कार्यालयात आणून द्या, आम्ही बघू त्याचं पुढे काय करायचं ते असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान कर्जमाफीवरून देखील त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आलो आहे, एखाद्या गोष्टीची जाहिरातबाजी करण्याचा माझा स्वभाव नाही, मात्र अजूनही शेतकरी ती कर्जमाफी विसरलेला नाहीये, आता सरसकट कर्जमाफी करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. कर्जमाफीची योग्यवेळ पंचांगात मुहूर्त बघून येणार का? जर कर्जमाफी झाली नाही तर शिवसेना शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर उतरणार असा इशाराही यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.