
उल्हासनगरच्या कुर्ला कॅम्प परिसरातील एका प्ले ग्रुपमध्ये शिकणाऱ्या अडीच वर्षांच्या चिमुकल्याला एका शिक्षिकेने अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कविता म्हणताना टाळ्या न वाजवल्याने संतापलेल्या शिक्षिकेने त्या चिमुकल्याला एकापाठोपाठ एक तीन जोरदार कानाखाली मारल्या. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर पालकांनी थेट पोलिसांकडे धाव घेतली आहे.
उल्हासनगरमधील एका प्रसिद्ध प्ले ग्रुपमध्ये ही घटना घडली आहे. या ठिकाणी शिक्षिका गायत्री पात्रा मुलांना कविता म्हणायला सांगत होत्या. ही कविता म्हणताना त्या मुलांना टाळ्या वाजवण्याच्या सूचनाही देत होत्या. यातील एका अडीच वर्षांच्या चिमुकल्याने कविता म्हटली. पण टाळ्या वाजवल्या नाहीत. यावर गायत्री पात्रा प्रचंड संतापल्या. त्यांनी त्याला टाळ्या वाजवण्यास सांगितले. पण तो चिमुकला ऐकत नसल्याचे पाहून त्यांनी कोणतीही दयामाया न दाखवता निरागस चिमुकल्याच्या कानाखाली एकापाठोपाठ एक अशा तीन वेळा जोरदार मारल्या. या मारहाणीमुळे तो चिमुकला प्रचंड घाबरला आणि रडू लागला.
ही संतापजनक घटना प्ले ग्रुपमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मात्र, नंतर कोणीतरी या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड करून तो मुलाच्या पालकांपर्यंत पोहोचवला. हा व्हिडीओ पाहून पालकांना मोठा धक्का बसला. त्यांनी तात्काळ विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. मुलाच्या पालकांनी पोलिसांना व्हिडीओ पुरावा म्हणून सादर केला. यानंतर त्यांनी शिक्षिका गायत्री पात्राच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
पालकांच्या तक्रारीनंतर विठ्ठलवाडी पोलिसांनी तात्काळ दखल घेतली. पोलिसांनी शिक्षिका गायत्री पात्रा हिच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम ३२३ (मारहाण) आणि अल्पवयीन मुलांची काळजी आणि संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू असून लवकरच शिक्षिकेला अटक केली जाण्याची शक्यता आहे. या घटनेने लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शाळांमध्ये किंवा प्ले ग्रुपमध्ये मुलांवर होणाऱ्या अशा अत्याचारांविरोधात कठोर नियम करण्याची मागणी पालकांकडून होत आहे.