
राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला पाऊस पुढील चार ते पाच दिवस असणार आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे राज्याच्या दक्षिण कोकण किनार्यावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. परिणामी राज्यात 24 ते 28 मेपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मुंबई, ठाणे, पालघरमध्ये वादळाचा असणारा धोका टळला आहे.
राज्यात मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाचा जोर कायम आहे. हवामान खात्याने शनिवारी मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये ऑरेंज अलर्ट दिला होता. आता मागे घेत यलो अलर्ट जारी केला आहे. परंतु पुढील चार दिवस पावसाचा जोर राहणार असून नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आज सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पुणे येथे पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. तसचे मराठवाड्यातील जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट दिला आहे. पुढील चार-पाच दिवस राज्यात पावसाचा अंदाज आहे, हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
राज्यात अवकाळी पाऊस सुरु असताना मान्सूनची वाटचाल केरळच्या दिशेने सुरु आहे. दोन दिवसांत मान्सून केरळमध्ये दाखल होईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. नैऋत्य मोसमी वारे अरबी समुद्राच्या दक्षिण भागासह, मालदीव, लक्षद्वीप, कर्नाटकातील काही भागात पोहचणार आहे. त्यामुळे मान्सूनला अनुकूल वातावरण निर्माण होत आहे.
कोकणात अवकाळी पाऊस सुरु आहे. सिंधुदुर्गमध्ये रिमझिम स्वरुपाचा पाऊस झाला. शनिवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वच भागांमध्ये रिमझिम स्वरूपाचा पाऊस होत आहे. चार दिवस झालेल्या अवकाळी पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. बुलढाणा येथे अवकाळी पाऊस झाला. बुलढाणा जिल्ह्यात मन्सूनपूर्व पावसाची रात्रभर संततधार सुरू होती. अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. जळगाव जिल्ह्यातील अनेक भागांत अवकाळी पाऊस झाला. भुसावळ व मुक्ताईनगर तालुक्यात सर्वात जास्त कांदा लागवडी करण्यात येते. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस सुरू असल्याने कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत.