गहू, हरभऱ्याचा सत्यानाश, हातातोंडाशी आलेला आंबा गेला… ऐन उन्हाळ्यात आभाळच फाटलं; अवकाळीने शेतकरी हवालदिल

शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की,आधीच उत्पादन खर्च वाढलेला असताना अवकाळी पावसामुळे झालेले हे नुकसान शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मोठा फटका देणारे ठरले आहे. त्यामुळे संबंधित विभागाने त्वरीत पाहणी करून नुकसानाचा अहवाल तयार करावा आणि लवकरात लवकर मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

गहू, हरभऱ्याचा सत्यानाश, हातातोंडाशी आलेला आंबा गेला... ऐन उन्हाळ्यात आभाळच फाटलं; अवकाळीने शेतकरी हवालदिल
Unseasonal rains cause huge damage to crops in the state
| Updated on: Feb 23, 2026 | 5:57 PM

धाराशिव जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी पहाटेच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांने काढून टाकलेल्या ज्वारीचे नुकसान झाले आहे.गेल्या दोन दिवसांपासून हवामानात अचानक बदल झाल्याने जिल्ह्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसला. शेतात काढून ठेवलेल्या ज्वारीवर पावसाचे पाणी साचल्याने ज्वारी काळी पडण्याची शक्यता आहे. तसेच हरभरा,द्राक्ष,आंबा,गहू या रब्बी हंगामातील पिकांनाही फटका बसण्याची मोठी शक्यता आहे. धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात अवकाळी पावसाने चांगलीच हजेरी लावल्याने ज्वारी पिकाचे नुकसान पाहायला मिळत आहे.

वाशिम जिल्ह्यात रब्बी हंगामातील गहू, कांदा बिजवाई आणि हरभरा ही पिके सध्या चांगली बहरात आली असून शेतकऱ्यांना यंदा चांगल्या उत्पादनाची अपेक्षा होती. अनुकूल वातावरणामुळे पिकांची वाढ समाधानकारक झाली असतानाच मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम आहे. हवामान विभागाने अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.हा अवकाळी पाऊस झाल्यास पिकांवर रोगराई वाढून उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आधीच वाढलेल्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी चिंतेत आहे.

सिंधुदुर्ग -फोंडाघाटात आंबा-काजू संकटात

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले दोन ते दिवस वातावरणात बदल झाला असून कधी धुके तर कधी ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. त्यातच फोंडाघाटासह परीसरात अवकाळी पावसाने झोडपून काढले. अचानक झालेल्या पावसामुळे सर्वांचीच तारांबळ उडाली.हवेत सुद्धा चांगलाच गारवा निर्माण झाला होता. आजही सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून उकाडा वाढला आहे.अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणाचा फटका आंबा आणि काजू पिकांना बसण्याची शक्यता असल्यामुळे बागायतदारांची चिंता वाढली आहे.

नागपूरात काल रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे शेकडो पोती धान्य भिजले आहे. एपीएमसी कळमना मार्केटमध्ये उघड्यावर असलेले धान्य अवकाळी पावसाने भिजले आहे.अवकाळी पावसाचा अंदाज असतानाही मार्केट प्रशासनाने धान्याचे पोती उघड्यावर ठेवली होती. त्यामुळे उघड्यावर असलेले धान्य भिजल्याने मोठे नुकसान झाले आहे.

ज्वारी पिकाचे नुकसान

बीड – परळी मांडेखेल शिवारात काल झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या ज्वारी पिकाचे नुकसान झाले आहे. परळी तालुक्यातील मांडेखेल शिवारात झालेल्या अवकाळी पावसामुळे ज्वारी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या ज्वारी पिकावर परिणाम झाला असून उभे पीक आडवे पडले, तसेच काही ठिकाणी कणसांना पाणी लागून उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तात्काळ पंचनामा करण्याची मागणी केली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून त्वरित आर्थिक मदत (भरपाई) मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

भंडाऱ्यात काढणीला आलेल्या पिकांवर संकट…

भंडारा जिल्ह्यात आज पहाटे चार वाजल्यापासून अचानक ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी कोसळू लागल्या.अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सध्या चना, वाटाणा आणि लाखोरी ही पिके काढणीच्या अवस्थेत आहेत. अशा वेळी झालेल्या पावसामुळे उभ्या व कापणीला आलेल्या पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पावसामुळे शेतात साचलेले पाणी आणि ओलाव्यामुळे उत्पादनाच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून संभाव्य आर्थिक फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गव्हाचे नुकसान होण्याची शक्यता

हिंगोली-जिल्ह्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाला सुरुवात झाल्याने नुकसान झाले आहे. वसमत शहरासह अनेक ठिकाणी हलक्या पावसाला सुरुवात झाल्याने काढणीला आलेल्या गव्हाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. गहू,तूर,आंबा उत्पादक शेतकरी अचानक आलेल्या अवकाळी पावसाने चिंतेत आहेत.

यवतमाळ

यवतमाळ येथेही अवकाळी पावसामुळे गहू पिकाला फटका बसला आहे. यवतमाळच्या महागाव तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपलं आहे. महागाव तालुक्यातील कोंदरी,वाकण या परिसरातील गहू या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रात्री अवकाळी पावसाने जोरदार वादळ वाऱ्यासह हजेरी लावल्याने नुकसान झाले आहे.

नागपूरात झाड कोसळल्याने कारचे नुकसान

नागपूरमधील वर्धा रोडवरील साईनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर अवकाळी पावसामुळे झाड कोसळल्याने कार चिरडल्याची घटना घडली आहे. या ठिकाणी उभ्या असलेल्या कारवर झाड कोसळल्याने कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कारच्या पुढील आणि मागील भागातील काचा फुटल्याने मोठे नुकसान झाले आहे. हे झाड रस्त्यावर पडल्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला, सकाळपासूनच हे झाड हटविण्याचे आणि रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू आहे.सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.मात्र कारचालकाचे आर्थिक नुकसान झाले आहे.