आम्ही मठाच्या स्वामींसोबत चर्चा करत आहोत, महादेवी हत्तीणीबाबत ‘वनतारा’कडून स्पष्टीकरण

कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील नांदणी मठातील ‘माधुरी’ ऊर्फ ‘महादेवी’ हत्तीणीला गुजरातमधील वनतारा प्राणी संवर्धन केंद्रात पाठवण्यात आले. ही हत्तीण पुन्हा कोल्हापूरमध्ये आणण्याची मागणी करण्यात आली आहे. यावर आता 'वनतारा'कडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

आम्ही मठाच्या स्वामींसोबत चर्चा करत आहोत,  महादेवी हत्तीणीबाबत वनताराकडून स्पष्टीकरण
Mahadevi and Vantara
| Updated on: Aug 02, 2025 | 7:48 PM

कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील नांदणी मठातील ‘माधुरी’ ऊर्फ ‘महादेवी’ हत्तीणीला गुजरातमधील वनतारा प्राणी संवर्धन केंद्रात पाठवण्यात आले. यावरून ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. ही हत्तीण पुन्हा कोल्हापूरमध्ये आणण्याची मागणी करण्यात आली आहे. यावर आता ‘वनतारा’कडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

वनताराने म्हटले की, कोल्हापूर येथील स्वस्तीश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी संस्थान मठातू अलिकडेच स्थलांतरित झालेल्या महादेवी (माधुरी) हत्तीणीसोबत असलेल्या प्रेम आणि आध्यात्मिक भावनांविषयी वनताराला खूप आदर आहे. तिची कोल्हापूरमधील उपस्थिती केवळ प्रतीकात्मक नव्हती, तर अनेकांसाठी पवित्र होती.

आम्ही हे स्पष्ट आणि आदरपूर्वक सांगू इच्छितो की वनताराने ही कार्यवाही स्वतःहून केलेली नाही. ही कार्यवाही माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत करण्यात आली, ज्याला नंतर भारताच्या माननीय सर्वोच्च न्यायालयानेही मान्यता दिली. आम्ही या स्थलांतराचे आरंभकर्ता नव्हतो, तर न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करणारी संस्था होतो, जी हिच्या देखरेखीची जबाबदारी पार पाडत आहे.

माधुरी हिच्या आरोग्याचे आणि दीर्घकालीन कल्याणाचे रक्षण करणे हाच आमचा एकमेव हेतू राहिला आहे. तिला आमच्या देखरेखीखाली आणण्याची संपूर्ण प्रक्रिया प्रेमपूर्वक, जबाबदारीने आणि कायदेशीर तसेच नैतिक निकषांचे काटेकोर पालन करत पार पाडली गेली.

जनतेच्या तीव्र भावनिक प्रतिसादाची आम्हाला पूर्ण जाणीव आहे आणि आम्ही त्याबाबद मनापासून सहानुभूती बाळगतो. म्हणूनच, करुणा आणि ऐक्याच्या भावनेतून, आम्ही कोल्हापूर येथील जैन मठ व पूज्य स्वामीजी यांच्यासोबत थेट संवाद सुरू केला आहे. कायदेशीर आणि पशुवैद्यकीय सल्ल्याच्या आधारे, आम्ही माधुरी हिच्या भविष्यासाठी सर्व शक्यता तपासत आहोत. ज्या द्वारे शांततामय मार्गेमाधुरी च्या कल्याणासोबतच समाजाच्या भावनांचा देखील सन्मान राखला जाईल.

वनतारा कोणत्याही धर्म, प्रदेश किंवा परंपरेच्या विरोधात नाही. आम्ही अशा मुक्या जीवांच्या सेवेसाठी आहोत, जे मानवी करुणेवर अवलंबून आहेत. आम्ही पारदर्शकतेस, कायद्याच्या पालनास आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे करुणेला पूर्णपणे वचनबद्ध आहोत. आम्ही जनतेला संघर्षासाठी नाही, तर माधुरी व अशा प्रत्येक प्राण्याच्या सन्मानपूर्वक व शांत आयुष्याच्या अधिकारासाठी आमच्या सोबत उभे राहण्याचे विनम्र आवाहन करतो.