
राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या निकालानंतर आता वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या महापौर निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येत्या ३० किंवा ३१ जानेवारीला महापालिकेत महापौर निवडीची प्रक्रिया पार पडणार आहे. विधानसभा निवडणुकीत आलेल्या संमिश्र अनुभवानंतर, महापालिकेत आपली पकड मजबूत करण्यासाठी बहुजन विकास आघाडीचे (बविआ) सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यावेळी अत्यंत सावध पावलं टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
वसई विरार महानगरपालिकेत सध्या महापौर पदाच्या शर्यतीत सहा नावे चर्चेत आहेत. तरी पक्षाचे संकटमोचक आणि रणनीतीकार आजीव पाटील यांचे नाव सर्वात आघाडीवर असल्याचे बोललं जात आहे. वसई-विरारच्या राजकारणात सर्व जाती-धर्मांना न्याय देण्यासाठी हितेंद्र ठाकूर नेहमीच सोशल इंजिनिअरिंगचा वापर करतात. विधानसभा निवडणुकीत झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर, आता महापालिकेत सत्ता टिकवताना सर्व समाजघटकांना सोबत घेण्याचे मोठे आव्हान ठाकूर यांच्यासमोर आहे. त्यामुळेच, ठाकुरांच्या मनात नक्की कोण? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
नुकत्याच महापालिका निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे. अशा परिस्थितीत, महापालिकेत आक्रमक झालेल्या भाजपाला रोखण्यासाठी आजीव पाटील यांच्यासारख्या अनुभवी आणि आक्रमक प्रवक्त्याची गरज पक्षाला भासत आहे. पाटील हे पक्षाचे संघटक सचिव असल्याने नगरसेवकांची मोट बांधण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरेल, असे बोललं जात आहे.
दरम्यान २२ जानेवारी २०२६ रोजी महापालिकेच्या महापौर पदासाठी सोडत काढण्यात आली. या सोडतीनुसार वसई-विरार महानगरपालिकेचे महापौरपद सर्वसाधारण प्रवर्ग (खुला) साठी आरक्षित करण्यात आले आहे. यामुळे आता बविआतील कोणत्याही गटातील अनुभवी नगरसेवकाला महापौर होण्याची संधी मिळू शकते. बविआ नेहमीच ख्रिश्चन, मुस्लिम, आगरी आणि उत्तर भारतीय अशा सर्व समाजांना प्रतिनिधित्व देते. जर आजीव पाटील यांना महापौर केले, तर उपमहापौर पदासाठी प्रकाश रॉड्रीग्ज (ख्रिश्चन) किंवा आलमगीर डायर (मुस्लिम) यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. जेणेकरून सोशल इंजिनिअरिंगचा समतोल राखला जाईल.