Navi Mumbai Crime : बहिणीला अधिक महत्त्व देते म्हणून संतापला; जन्मदात्या आईवरच उठला मुलाचा हात; वाशीत भयानक घडलं..
वाशीत एका मुलाने आपल्याच आईची कौटुंबिक वादातून निर्घृण हत्या केली. पत्नी आणि बहिणीवरून झालेल्या भांडणातून संतप्त मुलाने आईचा गळा आवळला. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, जन्मदात्या आई-मुलाच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या या गुन्ह्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

” आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं.. सर्वात असते तेव्हा जाणवत नाही, आता नसली कुठंच तरी नाही म्हणवत नाही ..!” फ. मु. शिंदे यांची ही कविता माहीत नाही, असे फार कमी लोकं असतील. अत्यंत कमी शब्दांत पण तितक्याच चपखलपणे आणि सुंदरपणे आईचं महत्व सांगणारी ही कविता. आई-मुलांचं नातं तर अगदी अनोखं. मुलांसाठी ती माऊली काहीही करायला तयार असते, हिकरणीसारखी जीव धोक्यात घालणारी तर कधी मुलांसाठी दुर्गेचं रूप घेणारीही. पण हीच मुलं आईच्या जीवावर उठली तर ? आई-मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी, वाचूनही विश्वास बसणार नाही अशी एक अत्यंत भयानक आणि काळीज पिळवटून टाकणारी घटना वाशीमध्ये (Crime News) घडली आहे. आपल्या पत्नीसाठी एका मुलाने जन्मदात्या आईचीच निर्घृण हत्या केल्याचा भयानक प्रकार वाशीत घडला आहे.
रविवारी अगदी किरकोळ कारणावरून कौटुंबिक वाद झाला, बघता बघता तो वाढला आणि संतापच्या भरात मागला-पुढला कोणताही विचार न करता नुलाने आपल्या आईला क्षणात संपवलं. या गुन्ह्याची माहिती मिळताच वाशी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठलं आणि कारवाई करत आरोपी मुलाला बेड्या ठोकत अटक केली. मात्र जन्मदाच्या मातेच मुलानेच जीव घेतल्याच्या या घटनेमुळे प्रचंड खळबळ उजाली असून परिसरात दहशतीचं वातावरण आहे. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
नेमकं काय घडलं ?
वाशीतील जुहूगाव परिसरात कौटुंबिक वादातून एका 42 वर्षीय मुलाने आपल्या 65 वर्षीय आईची कथितरित्या गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी सायंकाळी घडली. एवढेच नाही तर आरोपीने आईचे डोके जमिनीवर आपटल्याचेही पोलिसांनी सांगितले. नंदा रत्नाकर कदम असं मृत महिलेचं नाव असून त्या वाशीतील जुहूगाव, सेक्टर ११ येथील अष्टविनायक सोसायटीमधील रूम क्रमांक ३०३ मध्ये मुलगा महेश रत्नाकर कदम, सून आणि नातवंडांसोबत राहत होत्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदा कदम आणि त्यांच्या सुनेमध्ये घरगुती कारणांवरून वारंवार वाद होत होते. आई आपल्या बहिणीला आणि तिच्या कुटुंबाला अधिक महत्त्व देते, हे महेशला आवडतं नव्हतं. आई आपल्या पत्नीची उपेक्षा करत असल्याचा त्याचा समज होता. रविवारी सायंकाळी कुटुंबीयांमध्ये याच मुद्द्यावरून वाद झाला. या वादादरम्यान महेश संतापला आणि त्याने कथितरित्या काचेच्या पॅनेलच्या साहाय्याने आईचा गळा आवळला. त्यानंतर तिचं डोकं जमिनीवर आपटलं. मात्र या घटनेत नंदा कदम यांचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
हत्येनंतर ओरडत बसला आरोपी
आईची हत्या केल्यानंतर महेश घटनास्थळीच बसून ओरडत होता, अशी माहिती समोर आली. घरातून येणारा गोंधळाचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी तिथे धाव घेतली आणि समोरचं दृश्य पाहून ते थबकले. कोणीतरी पोलिसांना तत्काळ या घटनेची माहिती दिली. या गुन्ह्याचे वृत्त समजताच वाशी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झालं. पोलिसांनी नंदा कदम यांचा मृतदेह ताब्यात घेतला आणि आरोपी महेश कदम याला काही तासांतच अटक केली.
बाईकवरून मैत्रीणीला फिरायला घेऊन गेला, कठड्याला धडकून अपघात, तरूणाचा मृत्यू
दरम्यान नालासोपा येथे एक भीषण अपघात घडला असून त्यात तरूणाचा मृत्यू झाला. दुचाकीवरून मैत्रिणीला घेऊन कळंब समुद्रकिनारी फिरायला जात असताना दुचाकी पुलाच्या कठड्याला धडकून भीषण अपघात झाला. त्यामध्ये 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला 19 वर्षांची तरूणी गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर वसईच्या सर डी एम पेटीट रुग्णालयात उपचार सुरू आहेत .
मिळालेल्या माहितीनुसार, इब्राहिम शेख असं मृत तरुणाचं नाव असून, नालासोपारा पूर्व बिलाल पाडा परिसरातील तो राहणारा होता. तर स्नेहा गायकवाड असे जखमी तरुणीचे नाव असून ती विक्रोळी येथे राहणारी असल्याची प्राथमिक माहिती आहे. ती विक्रोळी वरून मित्राला भेटण्यासाठी नालासोपार कळंब येथे आली असता, दुचाकी वरून जाताना रविवारी हा अपघात झाला. याबाबत अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला असून, पोलीस अधिकचा तपास करीत आहेत