Vidhan Parishad Election : जागा भाजपला सुटल्याचे समजताच शिवसेनेचा बडा नेता तातडीने शिंदेंना भेटण्यासाठी मुंबईला रवाना
Vidhan Parishad Election : सध्या स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेची निवडणूक आहे. विधान परिषदेत एकूण 17 जागा आहेत. महायुती एकत्र राहून ही निवडणूक लढवणार आहे. अजूनपर्यंत कुठल्या पक्षाला किती जागा मिळणार? कोण कुठून निवडणूक लढवणार? हे स्पष्ट झालेलं नाही.

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विधान परिषदेच्या 17 जागांसाठी लवकरच निवडणूक होणार आहे. महायुती ही निवडणूक एकत्र लढवणार आहे. पण काही जागांवर भाजप-शिवसेनेमध्ये एकमत होत नाहीय. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपने घवघवीत यश मिळवलं आहे. त्यामुळे भाजपला जास्त जागा मिळणार हे स्वाभाविक आहे. महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही.शिवसेना शिंदे गट 6 जागांवर ठाम आहे तर भाजपने चार जागा सोडायला तयार आहे. त्यामुळे एकमत होत नाहीय. दरम्यान शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील जळगावहून तातडीने मुंबईकडे रवाना झाले आहेत. जळगाव विधान परिषदेचे जागा भाजपला सुटल्याच्या बातमीनंतर गुलाबराव पाटील जळगावहून तातडीने मुंबईकडे रवाना झाले.
जळगाव विधान परिषदेची जागा शिवसेनेला मिळावी यासंदर्भात मंत्री गुलाबराव पाटील पुन्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. जळगाव विधान परिषदेसाठी शिवसेना शिंदे गट आग्रही असून मंत्री गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव प्रतापराव पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. जळगाव विधान परिषदेच्या जागेवर भाजपने देखील दावा केला असून महायुतीत जागे संदर्भात मोठी रस्सीखेच पहायला मिळत आहे.
उद्या सायंकाळपर्यंत निर्णय
मंत्री गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव प्रतापराव पाटील यांनी कालच उमेदवारी अर्ज घेतला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या एक दिवस आधीच मंत्री गुलाबराव पाटील मुंबईकडे रवाना झाले आहेत. काय निर्णय होतो याकडे लक्ष आहे. यापूर्वीच जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेच्या सर्व आमदारांच्या शिष्टमंडळाने एकनाथ शिंदे यांची भेट घेत जागा द्यावी अथवा मैत्रीपूर्ण लढतीसाठी परवानगी देण्याची मागणी केली आहे. उद्या सायंकाळपर्यंत जळगाव विधान परिषदेच्या जागेबद्दल निर्णय होऊन अधिकृत घोषणेची शक्यता.
शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याकडून आधीच अर्ज दाखल
महायुतीत तिढा कायम असताना शिवसेना शिंदे गटाचे नेते रमेश बारसकर यांनी विधान परिषदेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सोलापुरात शिवसेनेला विश्वासात घेतले जात नाही,निधी देखील दिला जात नाही,असा आरोपही यावेळी रमेश बारसकर यांनी केला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीवरुनही शिवसेनेत भाजपविषयी काही ठिकाणी नाराजीची भावना आहे.