माझ्याशी पंगा घेतला तर वैयक्तिक खुलासे करेन; विजय वडेट्टीवार यांनी भरला आत्राम यांना दम

| Updated on: Apr 18, 2024 | 3:38 PM

गेल्या काही दिवसापासून राज्याचे मंत्री धर्मरावबाबा आत्राम आणि राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यात चांगलीच जुंपली आहे. विजय वडेट्टीवार हे भाजपमध्ये जाणार असल्याचा दावा आत्राम यांनी केला होता. त्याला वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर दिलं होतं. त्यानंतरही आज पुन्हा एकदा आत्राम यांनी हाच दावा करून वडेट्टीवार यांची कोंडी केली आहे. त्यावर वडेट्टीवार यांनी थेट आत्राम यांना दमच भरला आहे.

माझ्याशी पंगा घेतला तर वैयक्तिक खुलासे करेन; विजय वडेट्टीवार यांनी भरला आत्राम यांना दम
dharmarao baba atram
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

काँग्रेस नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे भाजपमध्ये येणार असल्याचा दावा राज्याचे मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केला आहे. आत्राम यांच्या या दाव्यानंतर आत्राम आणि वडेट्टीवार यांच्यात चांगलीच जुंपली आहे. आज पुन्हा एकदा आत्राम यांनी मोठा बॉम्ब टाकला. विमानतळावरील व्हिआयपी लाउंजमध्ये बैठक झाली होती. चंद्रशेखर बावनकुळे आणि वडेट्टीवार यांची बैठक झाली होती. या बैठकीला मीही उपस्थित होतो. यावेळी भाजपमध्ये येण्यासाठी वडेट्टीवार वेळ मागवून घेत होते. मी जे बोलतोय खरं बोलतोय, असा दावा धर्मरावबाबा यांनी केला आहे. त्यावर वडेट्टीवार यांनी पलटवार करताना इशाराच दिला आहे. माझ्यावर आरोप केले तर मी वैयक्तिक खुलासेही करेन, असा दमच विजय वडेट्टीवार यांनी आत्राम यांना भरला आहे.

धर्मरावबाबा आत्राम यांच्या पत्रकार परिषदेनंतर विजय वडेट्टीवार यांनी लगेच उत्तर दिलं आहे. विमानतळावर कधी कुठे पक्षाच्या बैठका होतात का? असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. मला वाटल काही गौप्यस्फोट करतील. एअरपोर्टल VIP लाउंजमध्ये बैठक झाली, असं आत्राम म्हणतात. अशा बैठका विमानतळावर होतात का? आरोप करताना थोडं तरी भान ठेवलं पाहिजे. बावनकुळे यांनी स्वत: खुलासा केला आहे. अशा काही चर्चा नाही, प्रस्ताव नाही, असं बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

माझ्याशी पंगा घेतला तर…

माझ्यावर नाहक आरोप केले जात आहेत. या प्रकरणी नार्को टेस्ट केली जावी. माझी तयारी आहे. माझी, बावनकुळे आणि धर्मरावबाबा अशा आम्हा तिघांची नार्को टेस्ट करावी. मी मोठ्या पदावर असताना दुसऱ्या पक्षात जाईल का? हे सत्तेचा उपभोग घ्यायला गेले. आता यांच्यामागे दलित, ओबीसी समाज राहिलेला नाही. आदिवासी समाजही यांच्यावर नाराज आहे.

त्यामुळे हे लोक भांबावले आहेत. काँग्रेसला मतदान करायचं हे जनतेनं ठरवलं आहे. त्यामुळे आत्राम बेछुट आरोप करत आहेत. मला लोकांनी निवडून दिलं आहे. माझ्याशी पंगा घेतला तर जशास तसे उत्तर देईन. माझ्यावर वैयक्तिक आरोप केले तर मी पण खुलासे करेन. वैयक्तिक पण खुलासे करेन, असा दमच त्यांनी भरला.