मुंबईत रात्री मोठा राडा, विद्यार्थ्यांचा मोर्चा अडवला? वडेट्टीवार यांच्याकडून व्हिडिओ पोस्ट
मुंबईत रात्री मोठा राडा झाला आहे. मुंबईत आदिवासी विद्यार्थ्यांचा मोर्चा अडवण्यात आल्याचा आरोप आहे. याबाबत विजय वडेट्टीवार यांच्याकडून व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे.

राज्यभरात विविध मागण्यांसाठी विद्यार्थी आंदोलन करत आहेत. पुण्यात एमपीएससी परीक्षा देणारे विद्यार्थी आंदोलन करत आहेत. दुसरीकडे आदिवासी विद्यार्थी देखील विविध मागण्यांसाठी आक्रमक झाले आहेत. मागील काही दिवसांपासून नाशिकमध्ये आंदोलन करणारे विद्यार्थ्यांनी मुंबईत येऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार, आदिवासी विद्यार्थी मुंबईत येत होते. त्याचवेळी पोलिसांनी आदिवासी विद्यार्थ्यांचा मोर्चा अडवल्याचा दावा करण्यात येत आहे. विजय वडेट्टीवर यांच्या या आरोपाने एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकहून मुंबईच्या दिशेने आलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना रात्रीच्या सुमारास अडवल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. पोलिसांनी विद्यार्थ्यांचे फोटो काढले. त्यानंतर केस करू’ अशी धमकी दिल्याचा विद्यार्थ्यांचा दावा आहे. विद्यार्थ्यांची बस देखील पोलिसांनी ताब्यात घेतल्याचाही आरोप आहे. आंदोलन सुरू होण्यापूर्वीच पोलिसांकडून अडवणूक केल्याने विद्यार्थ्यांनी एकच संताप व्यक्त केला. आदिवासी विकास मंत्री आणि आयुक्तांच्या राजीनाम्याची विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी आहे. वसतिगृहातील सुविधा, भोजन आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येत आहे. मुंबईत आंदोलनाची परवानगी मिळत नसल्याचा विद्यार्थ्यांचा यापूर्वीही आरोप आहे. त्यानतंर त्यांनी ५ ऑक्टोबर रोजी मुंबईत येऊन आंदोलनाची घोषणा केली होती.
आदिवासी विद्यार्थी आपल्या मागण्या मांडण्यासाठी आझाद मैदानावर येत आहेत, आणि त्यांना रात्री ३ वाजता वाटेतच अडवले जाते, हे कुठल्या लोकशाहीत बसते?
आरोप असे आहेत की विद्यार्थ्यांचे फोटो काढले गेले, त्यांना “केसेस करू” असे धमकावले गेले आणि त्यांची बस ताब्यात घेतली गेली. आंदोलन सुरू होण्याआधीच त्याला चिरडण्याचा प्रयत्न होत असेल, तर सरकार नेमके कशाला घाबरत आहे?
आदिवासी विकास मंत्री आणि आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी करणे हा या विद्यार्थ्यांचा संवैधानिक अधिकार आहे. त्यांच्याशी संवाद साधण्याऐवजी पोलिसी बळ वापरणे म्हणजे त्यांचा आवाज दाबणे आहे.
मुख्यमंत्री साहेब, विद्यार्थ्यांना भेटा, त्यांचे म्हणणे ऐका आणि दडपशाही थांबवा.
#Adivasi #aadivasirights #Repression
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) October 5, 2026
विजय वडेट्टीवर यांची पोस्ट जशीच्या तशी
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवर यांनी ‘एक्सवर पोस्ट करत म्हटल की, आदिवासी विद्यार्थी आपल्या मागण्या मांडण्यासाठी आझाद मैदानावर येत आहेत, आणि त्यांना रात्री ३ वाजता वाटेतच अडवले जाते, हे कुठल्या लोकशाहीत बसते? आरोप असे आहेत की विद्यार्थ्यांचे फोटो काढले गेले, त्यांना “केसेस करू” असे धमकावले गेले आणि त्यांची बस ताब्यात घेतली गेली. आंदोलन सुरू होण्याआधीच त्याला चिरडण्याचा प्रयत्न होत असेल, तर सरकार नेमके कशाला घाबरत आहे? आदिवासी विकास मंत्री आणि आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी करणे हा या विद्यार्थ्यांचा संवैधानिक अधिकार आहे. त्यांच्याशी संवाद साधण्याऐवजी पोलिसी बळ वापरणे म्हणजे त्यांचा आवाज दाबणे आहे. मुख्यमंत्री साहेब, विद्यार्थ्यांना भेटा, त्यांचे म्हणणे ऐका आणि दडपशाही थांबवा’.