पुण्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; विधानपरिषदेसाठी बड्या नेत्याची बंडखोरी, सत्ताधारी भाजपची डोकेदुखी वाढली
पुण्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. येत्या विधानपरिषदेसाठी बड्या नेत्याची बंडखोरी पाहायला मिळत आहे. यामुळे सत्ताधारी भाजपची डोकेदुखी वाढली आहे.

पुण्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट झाला आहे. विधानपरिषद निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीतही बंडखोरी पाहायला मिळत आहे. पुणे शिक्षक मतदारसंघासाठी भाजपने उमेदवार जाहीर केला आहे. तर दुसरीकडे शिंदे गटानेही या जागेसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे भाजपकडून शिंदे गटाची मनधरणी सुरू असताना पक्षातील नेत्याने मोठा हादरा दिला आहे. भाजपचे बब्रुवाहन रोंगे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून उतरणार असल्याची घोषणा केली आहे.
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर बंडखोरी करत स्वेरी कॉलेजचे संस्थापक बब्रुवाहन रोंगे हे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी विठ्ठलाचे दर्शन घेऊन रवाना झाले आहेत. पुणे विभागात जवळपास 38 हजार शिक्षक मतदारांची नोंदणी केल्याचा दावा रोंगे यांनी केला आहे. त्यामुळे मला भाजपकडून उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र माझे काम भाजपपर्यंत पोहोचवण्यास कमी पडलो असल्याची खंत ही रोंगे यांनी व्यक्त केली. मी पाच जिल्हे आणि 58 तालुक्यात शिक्षकांसाठी खूप काम केले आहे. त्यामुळे मला विजयाची खात्री आहे, असा दावा रोंगे यांनी व्यक्त केला आहे.
भाजपने उमेदवारी नाकारली म्हणून मी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत नाही. मी शिक्षकांच्या प्रश्नांसाठी अनेक वर्ष झगडत आहे. त्यांना न्याय मिळावा त्यांच्यासाठी काहीतरी करता यावे, यासाठी मी माझा उमेदवारी अर्ज भरत आहे. ही निवडणूक भाजपच्या चिन्हावर लढवली जात नाही, तर पसंती क्रमांकावर लढवली जात असल्याने भाजप माझ्यावर दबाव टाकेल, असे वाटत नाही. माझ्यावर किती दबाव आला तरी माझी उमेदवारी ही फिक्स असून ही निवडणूक मी जिंकणारच असा विश्वास रोंगे सरांनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे या जागेवर शिंदे गटाचीही नजर आहे. शिंदे गटाने मंगेश चिवटे यांच्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. या निवडणुकीदरम्यान, एकनाथ शिंदे हे दिल्लीला रवाना झाले आहेत.
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत महंत सुनील महाराज रिंगणात
अमरावती शिक्षक मतदारसंघात पोहरादेवीचे महंत सुनील महाराजही मतदारसंघाच्या निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. पेशाने प्राचार्य असलेले पोहरादेवीचे महंत भाजपचे सुनील महाराज बंडखोरी करणार असल्याचे समोर आलं आहे. महंत सुनील महाराज आज सोमवारी नामांकन अर्ज दाखल करणार आहेत. अमरावती मतदारसंघात भाजप इच्छुक उमेदवारांची मोठ्या प्रमाणावर बंडखोरी महायुतीची डोकेदुखी वाढणार आहे.
