खेळता खेळता श्वासच थांबला… 18 वर्षाच्या तरुण खेळाडूचा क्षणात मृत्यू, मैदानातच मातम
अर्जेंटिनामधील फुटबॉल मैदानात १८ वर्षीय एबेल नुनेज या तरुण खेळाडूचा दुर्दैवी मृत्यू झाला. मॅचदरम्यान डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जीव गेला. या घटनेने खेळाडूंच्या सुरक्षेचे आणि मैदानावरील आपत्कालीन वैद्यकीय व्यवस्थेचे गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत. खेळाच्या मैदानातील या चटका लावणाऱ्या घटनेने जगभरातील फुटबॉल चाहत्यांना धक्का बसला आहे.

खेळाच्या मैदानातून अनेकजण जगभर पोहोचतात. आपल्या धमाकेदार कामगिरीने रातोरात स्टार होतात. त्यामुळे खेळाडूंसाठी खेळाचं मैदान म्हणजे सर्व काही असतं. पण याच खेळाच्या मैदानात कधी कधी विचित्र घटना घडतात. चटका लावणाऱ्या घटना घडतात. गेल्या आठवड्यात फुटबॉलच्या मैदानात अशीच एक धक्कादायक घटना घडली होती. त्यामुळे सर्वच हादरून गेले होते.
अर्जेटिनातील ही धक्कादायक घटना आहे. या घटनेने जगभरातील फुटबॉल प्रेमींवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मॅचच्या दरम्यान एक शॉट थेट एबेल नुनेज या खेळाडूच्या डोक्याला जाऊन लागला. त्यामुळे त्याचा मैदानावरच मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर खेळाच्या मैदानावरील खेळाडूंची सुरक्षा आणि आपत्कालिन आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा एकदा गंभीर सवाल केले जात आहेत.
संपूर्ण ताकद लावून…
12 नोव्हेंबर रोजी ही धक्कादायक घटना घडली. अर्जेंटिनाची राजधानी ब्यूनस आयर्सजवळी जोस सी. पाज परिसरात ही घटना घडली. एफसी एजीजा आणि डेपोर्टिव्हो मुनिजच्या युवा टीमच्या दरम्यान सामना खेळवला गेला. मैदानात खेळ अत्यंत वेगाने आणि उत्साहात सुरू होता. त्यावेली विरोधी टीममधील एका खेळाडूने चेंडू क्लिअर करण्यासाठी संपूर्ण ताकद लावून एक जोराचा शॉट मारला. चेंडू फार दूर गेला नाही. पण प्रचंड वेगाने तो 18 वर्षाच्या एबेल नुनेज याच्या डोक्याला जाऊन लागला. व्हिडीओत विरोधी टीमच्या खेळाडूचा पायही त्याच्या डोक्याला लागताना दिसत आहे.
भोवळ आली, खाली कोसळला
ही टक्कर इतकी भयानक होती की तरुण खेळाडू स्वत:ला सावरून शकला नाही. चेंडू लागताच त्याला भोवळ आणि तो खाली कोसळला. तो बेशुद्ध पडला होता. तो कोसळताच संपूर्ण संघाने त्याच्या भोवती गराडा केला. डॉक्टरांनीही मैदानात येऊन त्याचा ताबा घेतला. मॅच थांबवली गेली. त्याला तात्काळ वैद्यकीय उपचार दिले गेले. पण वेळ निघून गेली होती.
खेळाडूंनी त्याला तात्काळ बाजूच्याच रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांच्या मते, चेंडू एवढा प्रचंड वेगात आला होती की. त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला. डोक्याची हड्डी फ्रॅक्चर झाली. डोक्यात रक्तस्त्राव सुरू झाला. एबेलचा जीव वाचवण्यासाठी त्याच्या डोक्याची सर्जरीही केली गेली. सर्व प्रयत्न केल्यानंतरही त्याचे प्राण वाचू शकले नाही. त्याचा मृत्यू झाल्याचं जाहीर करण्यात आलं. त्यामुळे दोन्ही संघावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
