तू कोण रे कुत्रा? आता सगळ्यांनाच… वाल्मिक कराडची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल; काय म्हटलं?
वाल्मिक कराडची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये कराड एका व्यक्तीला धमकावताना दिसत आहे.

Walmik Karad Audio Clip : मस्साजोगचे सरंपच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड सध्या तुरूंगात आहे. बीडच्या जिल्हा कारागृहात त्याच्या जीवितास धोका असल्याचा दावा संशय व्यक्त केला जात आहे. काही दिवसांपूर्वी बीडच्या कारागृहात असलेल्या गीते गँग आणि कराड गँग यांच्यात भांडण, मारामारी झाली होती. त्यानंतर आत कराडच्या जीवितास धोका असल्याचा संशय पोलिसांना आणि तुरुंग प्रशासनाला आला आहे. त्यामुळे आता त्याला बीड जिल्हा कारागृहातून थेट नाशिकच्या तुरुंगात हलवले जाणार आहे. असे असतानाच आता वाल्मिक कराडची एक कथित धक्कादायक ऑडिओ क्लिप समोर आली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये पैशाच्या व्यवहारातुन वाल्मीक कराडने एका तरूणाला जातीवाचक शिवीगाळ केल्याचं समोर आले आहे. टीव्ही 9 मराठी मात्र या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.
कॉल रेकॉर्डिंगमध्ये नेमकं काय आहे?
मिळालेल्या माहितीनुसार पैशाच्या व्यवहारातून वाल्मिक कराडने एका तरूणाला जातीवाचक शिवीगाळ केल्याची कथित कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे. आता सगळ्यांनाच मध्ये घेतो..तू कोण रे कुत्रा.. अशा प्रकरणाची भाषा वापरत यात कराडने जातीवाचक शिवीगाळ केली आहे. समोरच्या व्यक्तीने कामासाठी लाखो रुपये दिले होते. मात्र ते वाल्मिक कराड परत देत नसल्याने संबंधित तरुणाने वारंवार फोन केल्याची माहिती आहे. याचाच वाल्मिक कराडला राग आला आणि त्याने थेट जातीवाचक शिवीगाळ केली.याचीच एक धक्कादायक कथित कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे.
एका व्यक्तीने वाल्मिक कराडकडे…
या कॉल रेकॉर्डिंग संदर्भात वाल्मिक कराडचे जुने सहकारी विजयसिंह (बाळा) बांगर यांनी सविस्तर माहिती दिली आहे. एका व्यक्तीने वाल्मिक कराडकडे कामासाठी 25 लाख रुपये दिले होते. मात्र हे पैसे परत देत नसल्याने संबंधित व्यक्ती वारंवार फोन करत होती. त्याचाच कराडला राग आला आणि यानंतर त्याला बोलावून घेऊन पाच लाख रुपये दिले आणि खंडणीच्या गुन्ह्यात अडकवले, अशी धक्कादायक माहिती बांगर यांनी दिली आहे.
तुरुंगात कराडच्या जीवितास धोका
दरम्यान, आता ही कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने वाल्मिक कराड हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. तुरुंगात कराडच्या जीवितास धोका आहे, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. असे असतानाच आता कराडची ही ऑडिओ क्लिप समोर आली आहे. त्यामुळे आता नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
