हिंगणघाटच्या हैवानाचा एन्काऊण्टर करा, जनसमुदाय उत्स्फूर्तपणे रस्त्यावर, पीडितेसाठी 72 तास महत्त्वाचे

लहान मुली, शालेय विद्यार्थिनींपासून महिला, पुरुष आणि ज्येष्ठ नागरिकही 'हिंगणघाट बंद'मध्ये सहभागी झाले.

Wardha Hinganghat Bandh, हिंगणघाटच्या हैवानाचा एन्काऊण्टर करा, जनसमुदाय उत्स्फूर्तपणे रस्त्यावर, पीडितेसाठी 72 तास महत्त्वाचे

वर्धा : हिंगणघाटमध्ये पेट्रोल टाकून पेटवलेल्या पीडित प्राध्यापिकेची प्रकृती चिंताजनक आहे. तरुणीची मृत्यूशी झुंज सुरु असून पुढील 72 तास महत्त्वाचे असल्याचं तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं. पीडितेला न्याय देण्याच्या मागणीसाठी हिंगणघाट शहरातील मोठा जनसमुदाय उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरला आहे. हिंगणघाटच्या हैवानाचा एन्काऊण्टर करा, अशी मागणी सामान्यांकडून होत आहे. लहान मुली, शालेय विद्यार्थिनींपासून महिला, पुरुष आणि ज्येष्ठ नागरिकही ‘हिंगणघाट बंद’मध्ये (Wardha Hinganghat Bandh) सहभागी झाले आहेत.

पीडितेला न्याय द्या, अशी मागणी करत मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय रस्त्यावर उतरला आहे. ज्याप्रमाणे पीडितेला जाळण्यात आलं, तसंच आरोपीलाही जाळा, अशी मागणी काही संतप्त नागरिकांनी केली. नराधम आरोपीचा एन्काऊण्टर करा किंवा त्याला फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी प्रामुख्याने मोर्चात करण्यात आली. सर्वपक्षीयांनी ‘हिंगणघाट बंद’ची हाक दिल्यानंतर चौकाचौकातील दुकानं बंद करण्यात आली. मोठ्या संख्येने नागरिकांनी रस्त्यावर उतरुन मोर्चात सहभाग नोंदवला.

फाशी द्या, पीडितेच्या वडिलांची मागणी

माझ्या मुलीला जसा त्रास दिला, तसाच त्रास त्याला व्हायला पाहिजे. आरोपीला फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी पीडितेच्या वडिलांनी ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना केली. फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून लवकरात लवकर शिक्षा देण्यात यावी, अशी इच्छाही त्यांनी बोलून दाखवली. मी गरीब शेतकरी असल्याने सरकारने उपचारासाठी मदत करावी, अशी मागणीही पीडितेच्या वडिलांनी केली.

माझी मुलगी लवकर बरी झाली पाहिजे. माझ्या मुलीला पेट्रोल टाकून जाळलं, तसं त्यालासुद्धा जाळलं पाहिजे, अशी मागणी पीडितेच्या आईने केली. शासनाने आम्हाला उपचारासाठी पूर्ण मदत करावी. माझ्या मुलीचा चेहरा पूर्ण खराब झाला आहे. त्यामुळे मी जगून काय करु, माझ्या जगण्याला काही अर्थ राहिला नाही, असं पीडिता म्हणाल्याचं आईने सांगितलं. ‘काही दिवसांपूर्वी त्या मुलाला समज दिली होती, मात्र तो ऐकला नाही. असं काही होईल, असं आम्हाला वाटलं नव्हतं’ अशा भावनाही आईने व्यक्त केल्या.

दरम्यान, पीडित तरुणीच्या प्रकृतीत किंचित सुधारणा असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. मात्र तिच्या तोंड आणि श्वसन नलिकेला गंभीर इजा झाल्याने कृत्रिमरित्या श्वासोच्छ्वास सुरु आहे. त्वचेचे पाचही थर जळाल्यामुळे जंतूसंसर्ग होण्याचा धोका आहे. ऑक्सिजनची मात्रा वाढवली असून तज्ज्ञ डॉक्टरांचा चमू पीडित तरुणीवर लक्ष ठेवून असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. पीडितेची प्लॅस्टिक सर्जरी करावी लागेल, असंही डॉक्टरांनी सांगितलं.

आरोपी विकेश ऊर्फ विक्की नगराळे याला आज न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यावेळी पोलिसांनी आरोपीचा पाच दिवसाचा रिमांड मागितला. त्यानंतर न्यायालयाने आरोपीला 8 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. परिसरात तणावाचं वातावरण असल्याने पोलिसांनी गुप्तरित्या आरोपीला न्यायालयात हजर करत तातडीने रवानाही केलं.

हिंगणघाट शहरात काल (3 फेब्रुवारी) सकाळी साडेसातच्या सुमारास संबंधित प्राध्यापिकेच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यामध्ये ती 20 ते 30 टक्के भाजली. तिच्यावर नागपुरात उपचार सुरु आहेत. घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.

काय घडलं नेमकं?

30 वर्षीय प्राध्यापिका दररोज सकाळी कामावर जाताना आरोपी विक्की नगराळे तिचा पाठलाग करायचा. नेहमीप्रमाणे शिक्षिका कॉलेजमध्ये शिकवायला जात असताना आरोपी तिचा पाठलाग करत होता. हिंगणघाट शहरातील एका चौकात येताच आरोपीने तिच्यावर पेट्रोल ओतून तिला जाळण्याचा प्रयत्न केला. आरोपी हा शिक्षिका राहत असलेल्या दारोडा गावातीलच आहे.

Wardha Hinganghat Bandh

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *