Washim Corona Updates : वाशिममध्ये कोरोनाचा स्फोट, 229 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

Washim Corona Updates : वाशिम जिल्ह्यातील देगाव परिसरात एक आदिवासी निवासी शाळा आहे. (Washim 229 Student Corona Positive)

Washim Corona Updates : वाशिममध्ये कोरोनाचा स्फोट, 229 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण
सांकेतिक फोटो
| Edited By: | Updated on: Feb 25, 2021 | 10:22 AM

वाशिम : राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाशिम जिल्ह्यातील एका आदिवासी निवासी शाळेमधील 229 विद्यार्थ्यांनी कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. काल लातूरमधील एका शाळेत तब्बल 45 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. (Washim 229 Student Corona Positive)

वाशिम जिल्ह्यातील देगाव परिसरात एक आदिवासी निवासी शाळा आहे. या शाळेतील 327 पैकी एकूण 229 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. विद्यार्थ्यांसह चार कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना झालेले बहुतांश विद्यार्थ्यांचे वय हे 13 ते 15 इतके आहे. तसेच बहुतांश विद्यार्थी हे अमरावती जिल्ह्यातील धारणी,अचलपूर आणि मेळघाट पट्टयातील भागातील आहेत.

हे सर्व विद्यार्थी 14 फेब्रुवारीला शाळेत दाखल होते. या सर्व विद्यार्थ्यांची RTPCR चाचणी करण्यात आली होती. या चाचणीनंतर कोरोना संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान निवासी शाळेमुळे मोठ्या प्रमाणात संसर्ग पसरला आहे. कोरोनाबाधित आढळलेल्या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांना थोडीशी सर्दी होती. उर्वरित विद्यार्थ्यांना कोणतेही लक्षणे अथवा त्रास जाणवत नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या सर्व विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी 24 तास आरोग्य पथके तैनात करण्यात आली होती.

कोरोनाबाधित विद्यार्थ्यांची वेळोवेळी तपासणी 

कोरोनाबाधित विद्यार्थ्यांना योग्य उपचार मिळण्यासाठी आरोग्य विभागाने दोन डॉक्टरांसह दोन आरोग्य पथके आळीपाळीने 24 तास निवासी शाळेमध्ये तैनात ठेवावीत. या पथकाने ठराविक अंतराने सर्व विद्यार्थ्यांच्या शरीराचे तपामान, ऑक्सिजन पातळीची तपासणी करावी. तसेच त्यांना इतर काही लक्षणे असल्यास त्याची तपासणी करून त्यानुसार तातडीने उपचार करावेत. शाळा व्यवस्थापनाने सुद्धा कर्मचाऱ्यांचे एक पथक 24 तास तैनात ठेवावे. विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होत असल्यास तातडीने आरोग्य पथकाच्या निदर्शनास आणून द्यावे. सर्व विद्यार्थ्यांना वेळेवर व योग्य आहार मिळेल याची खबरदारी घ्यावी. कोणत्याही विद्यार्थ्याची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिल्या आहेत.  (Washim 229 Student Corona Positive)

शाळेचा परिसर कन्टेन्मेंट झोन म्हणून घोषित

एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित आढळल्यानंतर या शाळेचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र (कन्टेन्मेंट झोन) घोषित करण्यात आला आहे. बाधित आढळलेले सर्व विद्यार्थी शाळेच्या वसतिगृहात निवासी स्वरुपात राहणारे आहेत. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील 151, यवतमाळ जिल्ह्यातील 55, वाशिम जिल्ह्यातील 11, बुलडाणा जिल्ह्यातील 3, अकोला जिल्ह्यातील 1, हिंगोली जिल्ह्यातील 8 विद्यार्थ्यांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.
निगेटिव्ह विद्यार्थ्यांची स्वतंत्र व्यवस्था 
दरम्यान शाळेमध्ये निवासी स्वरुपात राहणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी जे विद्यार्थी निगेटिव्ह आहेत, त्यांची संपूर्ण व्यवस्था स्वतंत्र ठेवावी. तसेच बाधित आढळलेल्या विद्यार्थ्यांच्या संपर्कात आलेले इतर स्थानिक विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची कोरोना चाचणी तातडीने करून घ्यावी. यासाठी विशेष कॅम्पचे आयोजन करावे, अशी माहिती जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी सांगितले. (Washim 229 Student Corona Positive)

संबंधित बातम्या : 

मोठी बातमी ! राज्यातली पहिली प्रवेशबंदी, परभणीमध्ये 11 जिल्ह्यातील प्रवाशांना बंदी

कोल्हापुरात कोरोनाचा धोका वाढला, अंबाबाई आणि जोतिबांच्या दर्शनाच्या वेळेत बदल, पुन्हा देऊळ बंद?