weather forecast : आयएमडीकडून धडकी भरवणारा इशारा, पुढील 24 तास धोक्याचे, अतिमुसळधार पावाचा इशारा, महाराष्ट्रात…
भारतीय हवामान विभागाकडून पुन्हा एकदा हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे, पुढील 24 तासांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दहा राज्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

नोव्हेंबर महिना आता संपत आला आहे, लवकरच डिसेंबर महिन्याला सुरुवात होणार आहे. आता थंडीची चाहुल लागण्यास सुरुवात झाली आहे. सध्या देशभरात काहीसं विचित्र वातावरण पहायला मिळत आहे. काही राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे, तर काही राज्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. चक्रीवादळाचा प्रभाव म्हणून महाराष्ट्रातही काही जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये उत्तर भारतामध्ये थंडीचा कडाका चांगलाच वाढण्याची शक्यता आहे. सरासरी तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने घसरण होण्याची शक्यता आहे. परिणामी पंजाब, दिल्ली, हिमाचल प्रदेश, हरियाणा या सारख्या राज्यांमध्ये थंडीचा कडका चांगलाच वाढण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे तब्बल दहा राज्यांना भारतीय हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
दहा राज्यांना पावसाचा अलर्ट
दरम्यान भारतीय हवामान विभागाकडून दहा राज्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 24 तासांमध्ये उत्तर पूर्व राज्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. आसाम, मेघालय, नागलँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, या राज्यांसह इतर काही राज्यांमध्ये पुढील 24 तासांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता असून, या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे, पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा इशाराही हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात काय स्थिती?
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढण्यास सुरुवात झाली आहे. उत्तर महाराष्ट्रासह पुणे जिल्ह्यात तापमानात मोठी घट झाली आहे. इतरही काही जिल्ह्यांमध्ये गारठा वाढत आहे. राज्यातील बहुतांश भागात वातावरण निरभ्र राहण्याची शक्यता आहे. दरम्यान पुढील काळात आता राज्यात थंडीचा कडका वाढतच जाण्याची शक्यता आहे.
गोंदिया जिल्ह्यात पावसाची हजेरी
दरम्यान एकीकडे राज्यात थंडीचा कडाका वाढत असताना दुसरीकडे मात्र गोंदिया जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली आहे. कालपासून सतत रिमझिम पाऊस सुरूच आहे. या पावसाचा धान पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.