
राज्यात २९ महानगर पालिका निवडणूकीची रणधुमाळी सुरु आहे. परवाच विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केली आहेत. या उमेदवारीची छाननी सुरु असतानाच अनेक ठिकाणी महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे आता विविध आघाडी आणि युत्यांच्या गोंधळात प्रचाराला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलन नेते मनोज जरांगे यांनी नाशिक येथे मोठे विधान केले आहे.
मनोज जरांगे पाटील यावेळी म्हणाले की समाजासाठी राजकारण लोकांनी केले पाहिजे. आमचा चांगला सहकारी आहे. त्यांना चांगला पाठींबा द्या. समाजात चांगले काम करणारे टिकले पाहिजेत. समाजाने देखील त्यांना राजकारणात सहकार्य केले पाहिजे. माझ्या हातात मतं नाही पण समाजाला मी आवाहन करू शकतो. आजचं व्यासपीठ राजकिय नव्हतं. पण मी जे बोलायचं होतं ते बोललो आहे. गायकर निवडणुकीला उभे आहेत हे माहिती नव्हतं, माहिती असतं तरी आधी आलो असतो. काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मागे मी नेहमी उभा राहतो असेही जरांगे पाटील यांनी यावेळी सांगितले.
मनोज जरांगे पाटील यावेळी म्हणाले की समाजातील काम करणाऱ्या पोरांना सांभाळले पाहिजे, समाजाची लढाई लावून धरणाऱ्यांचा समाजाने सांभाळ केला पाहिजे. नंतर वेळ निघून गेल्यावर रडत बसण्यापेक्षा लढले पाहिजे. ज्यावेळी या राजकीय पटलावर समाजाचे पोरे उभे राहत असतील तर बळ दिले पाहिजे. मत माझ्या हातात नाही. पण समाजाला चांगला संदेश देतो आपल्या मुलांना बळ द्या मग क्षेत्र कोणते पण असेल असे जरांगे पाटील यांनी सांगितले.
भाजपाच्या ट्रोलिंगनंतर माघार घेणाऱ्या भाजपा उमेदवार पूजा मोरे यांच्याविषयी विचारले असता जरांगे पाटील म्हणाले की मला आत्ताच समजले, माहिती नव्हते. त्यांच्यावर अन्याय झाला असेल तर मग हे योग्य नाही. परतू त्यांच्या प्रकरणी माहिती गोदर वक्तव्य करणे योग्य होणार नाही. तुमच्या माध्यमातून समजत आहे की त्यांच्यावर अन्याय झाला आहे. अशा प्रकारे जुने व्हिडिओ काढून ट्रोलिंग होत असेल हे चुकीचे आहे असेही जरांगे पाटील म्हणाले.
ते पुढे म्हणाले की सामाजिक क्षेत्रात काम करत असताना त्यापद्धतीचे बोलावे लागते तरच न्याय मिळतो नाही तर न्याय मिळत नाही. आणि तुम्ही आता व्हिडिओ काढत असाल तर बाकीच्यांचे पण व्हिडिओ आहेत. यात माफी मागायचा संबंध नाही. माफी मागू पण नाही. हे राजकारण आहे याच्यात जो आपला बळी द्यायचा प्रयत्न करेल त्याचा बळी पण घेतला पाहिजे. आपण जातीने क्षत्रिय मराठा आहोत. जुने व्हिडिओ पसरवायचे आणि माघार घ्यायला लावायचे हे जर सत्य असेल तर त्याचे दुष्परिणाम त्यांना सुद्धा भोगावे लागतील. मी समाजाला पुन्हा सांगतो निवडणुकीत उभ्या असलेल्या चळवळीतील कार्यकर्त्यांच्या पाठीमागे समाजाने उभं राहावे असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.