राज ठाकरेंना नडणारा वाचाळवीर सुशील केडिया नेमका आहे तरी कोण?
सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना मराठी भाषेच्या आग्रहावरून डिवचलं होतं. त्यानंतर आता मनसे कार्यकर्त्यांनी त्यांत्या कार्यालयाची तोडफोड केली. हे केडिया कोण आहेत ते जाणून घेऊयात.

मुंबईत राहणाऱ्या परप्रांतीयांनीही मराठी बोलली पाहिजे असा आग्रह मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंचा आहे. मात्र प्रसिद्ध व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना मराठी भाषेच्या आग्रहावरून डिवचलं होतं. केडिया यांनी म्हटलं की, ‘राज ठाकरे, लक्षात घ्या की, मी मुंबईत 30 वर्षांपासून राहत असून मला मराठी नीट येत नाही. आणि तुमच्या वाईट वागणुकीमुळे मी असा निश्चय केला आहे की, जोपर्यंत तुमच्यासारखे लोक मराठी भाषेचे कैवारी म्हणून वावरत आहेत, तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही, काय करायचंय बोल?.’
सुशील केडिया यांच्या या पोस्टनंतर राज ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी आणि मनसे नेत्यांनी त्यांना धमक्या दिल्या होत्या. केडिया यांनी मुंबई पोलिसांना धमक्यांची माहिती देत संरक्षण मागितले होते. मात्र आता त्यांच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला आहे. मनसे कार्यकर्त्यांनी कार्यालयाची तोडफोड केली. मात्र राज ठाकरेंना नडणारे केडिया नेमके कोण आहे ते जाणून घेऊयात.
कोण आहेत सुशील केडिया?
सुशील केडिया हे शेअर बाजार आणि गुंतवणूक क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. त्यांना या क्षेत्रात 25 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बँकांमध्ये काम केलेले आहे. सुशील केडिया हे मार्केट टेक्निशियन असोसिएशनच्या संचालक मंडळात सामील होणारे आशियातील पहिले व्यक्ती आहेत. ते केडियानोमिक्स ही फर्म चालवतात, ही फर्म शेअर बाजाराशी संबंधित सेवा देते. केडिया हे अनेक बिझनेस चॅनेलवर एक्सपर्ट म्हणून मार्गदर्शन करतात. ते गेल्या तीस वर्षांपासून मुंबईत राहत आहेत. त्यांना हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त बऱ्याच भारतीय भाषांचे ज्ञान आहे.
सुशील केडिया यांनी मागितली माफी
सुशील केडिया यांनी माफी मागितली आहे. त्यांनी म्हटलं की, ‘मी केलेलं ते ट्विट चुकीच्या मानसिक अवस्थेत व तणावात लिहिलं गेलं होतं. मराठी न कळणाऱ्या काही जणांवर झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर मी मानसिक तणावाखाली होतो. पण मला आता जाणवत आहे की मी माझी प्रतिक्रिया मागे घ्यायला हवी. राज ठाकरे यांच्याबद्दल मला नेहमीच आदर आहे. मी माझी चूक मी स्विकारतो. त्यांनी वातावरण शांत करावं, मी त्यांचा आभारी आहे.’