शिवसेना कुणामुळे फुटली? रामदास कदम यांनी घेतलं या नेत्याचं नाव; राजकारणात खळबळ उडवणारं विधान

रामदास कदम यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत शिवसेना ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे, यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि अनिल परब यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

शिवसेना कुणामुळे फुटली? रामदास कदम यांनी घेतलं या नेत्याचं नाव; राजकारणात खळबळ उडवणारं विधान
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 05, 2025 | 3:56 PM

शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यात बोलताना मोठा दावा केला होता, बाळासाहेब ठाकरे यांचा मृतदेह दोन दिवस मातोश्रीवर होता, त्यांच्या हाताचे ठसे घेण्यात आले, असा आरोप कदम यांनी केला होता, यावरून आता वातावरण चांगलंच तापलं आहे. शनिवारी शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन कदम यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. यावेळी बोलताना परब यांनी कदम यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केला. त्यानंतर आज पुन्हा एकदा आता कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन, ठाकरे गटाकडून करण्यात आलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे.

नेमकं काय म्हणाले कदम? 

कदम यांनी अनिल परब यांच्यावर निशाणा साधताना  अनिल परब यांच्यामुळेच शिवसेना फुटल्याचा आरोप केला आहे. पक्ष फुटला, सर्व लोक पक्षातून बाहेर पडले त्याला हाच चमचा कारणीभूत असल्याचा घणाघात यावेळी कदम यांनी केला आहे. परब यांनी त्यांच्या विभागात किती लोक निवडून दिली? त्यांना फक्त चुगल्या करायला आवडतात आणि उद्धव ठाकरे यांना सुद्धा अशीच माणसं आवडतात असं देखील यावेळी कदम यांनी म्हटलं आहे.

दरम्यान अनिल पबर यांनी पुन्हा एकदा डान्सबारवरून कदम यांच्यावर निशाणा साधला होता, त्याला देखील त्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तो डान्सबार नव्हता, फक्त ऑर्केस्ट्रा होता. त्याचं परमिशन होतं. फक्त कदम कुटुंबीयांना बदनाम करण्यासाठी डान्सबार डान्सबार म्हणून  बदनाम केलं गेलं. मी कोर्टात जात आहे,  हे हॉटेल ३० वर्षापासूनचं आहे. एक तरुणी विक्षिप्त हावभाव करत होती, म्हणून मी त्या शेट्टीला काढलं. परवाना रद्द केला. दीड महिन्यानंतर अनिल परब बोलले,  त्यांना झोपेतून जाग आली, मुलींचे पैसे खाणारा मी नाहीये, असंही यावेळी कदम यांनी म्हटलं आहे. दरम्यान व्हिलेपार्ले  येथील एसआरएची योजना सुरू आहे. ती अजून पूर्ण झाली नाही,  माझ्याकडे प्रतिज्ञापत्र आहे, अनिल परब यांनी 8 हजार मराठी माणसांना घर खाली करा म्हणून दम दिला, असा आरोपही यावेळी कदम यांनी केला आहे.