शिवसेना कोणाची? पक्षाचं चिन्ह कोणाला मिळणार? असीम सरोदेंनी सांगितलं कोर्टात नेमकं काय घडणार, निकाल कधी लागणार

शिवसेना पक्षाचं चिन्ह आणि नाव कोणाचं यावर सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. शिवसेना ठाकरे गटाचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे, तर दुसरीकडे आता शिवसेना शिंदे गटाचा युक्तिवाद सुरू आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना ज्येष्ठ वकील आसीम सरोदे यांनी मोठा दावा केला आहे.

शिवसेना कोणाची? पक्षाचं चिन्ह कोणाला मिळणार? असीम सरोदेंनी सांगितलं कोर्टात नेमकं काय घडणार, निकाल कधी लागणार
asim sarode
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 20, 2026 | 9:19 PM

सध्या शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह कोणाचं? शिवसेना शिंदे गट की शिवसेना ठाकरे गट यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. शिवसेना ठाकरे गटानं आपला युक्तिवाद पूर्ण केला आहे. शिवसेना ठाकरे गटाची बाजू मांडताना ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. तर दुसरीकडे आता शिवसेना शिंदे गटाकडून सुप्रीम कोर्टात आपली बाजू मांडण्यात येत आहे. शिवसेना शिंदे गटाच्या वतीने नीरज कौल हे न्यायालयात बाजू मंडत आहेत. या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. निकाल काय लागणार? शिवसेना पक्षाचं चिन्ह कोणाला मिळणार? याबाबत प्रत्येकाच्या मनात मोठी उत्सुकता आहे. दरम्यान यावर आता प्रतिक्रिया देताना ज्येष्ठ वकील असीम सरोदे यांनी मोठं विधान केलं आहे.

नेमकं काय म्हणाले असीम सरोदे? 

शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा निकाल हा उद्धव ठाकरे यांच्या बाजूनेच लागेल, असा दावा यावेळी असीम सरोदे यांनी केला आहे.  या महिन्याच्या शेवटपर्यंत सुनावणी संपेल, निकाल राखीव ठेवला जाईल आणि पुढच्या महिन्यात निकाल लागेल. न्यायमूर्ती बागची यांनी शिवसेना चिन्ह का गोठवलं गेलं नाही? हा सवाल उपस्थित केला आहे, हा सवाल बरोबर आहे. निवडणूक आयोगाची भूमिका शंकास्पद राहिली आहे, निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाला सुटेबल होईल असं वागत आहे, असा आरोपही यावेळी सरोदे यांनी केला आहे.

दरम्यान 2022 ला शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाण गोठवण्यात आलं होतं, 2022 च्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना मशाल चिन्ह दिलं होतं आणि एकनाथ शिंदे यांना ढाल तलवार हे चिन्ह दिलं ते कायम का ठेवण्यात आलं नाही? असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.  चिन्ह गोठवणे ही प्रक्रिया मागे झाली आहे, निवडणुका झाल्या त्या बेकायदेशीर ठरवता येणार नाहीत. यापुढे असं काही होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. त्यांनी बाळासाहेबांच्या पुण्याईवर निवडणूक लढवली एकनाथ शिंदे यांनी स्वत:च्या ताकदीवर निवडणूक का लढवली नाही? हा प्रश्न देखील निर्माण होतो. भारतातील सर्वच पक्षात एकाधिकारशाही चालत आहे, त्याशिवाय पक्ष चालू शकत नाही, असं यावेळी सरोदे यांनी म्हटलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us