निवडणुका पुढे का ढकलल्या? निवडणूक आयोगाने दिले स्पष्टीकरण, नेमकं काय म्हटलं?

Maharashtra Election Commission : निवडणूक आयोगाकडून राज्यातील तब्बल 24 नगरपालिका आणि 150 सदस्यांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामागील कारण आता निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले आहे.

निवडणुका पुढे का ढकलल्या? निवडणूक आयोगाने दिले स्पष्टीकरण, नेमकं काय म्हटलं?
Maharashtra Election Commission
Image Credit source: TV 9 Marathi
Updated on: Dec 01, 2025 | 5:08 PM

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. मंगळवारी दोन डिसेंबरला नगर पालिका आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. मात्र या मतदानाच्या दोन दिवस आधी निवडणूक आयोगाकडून राज्यातील तब्बल 24 नगरपालिका आणि 150 सदस्यांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राजकतीय पक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे. अनेक उमेदवारांना आता पुन्हा प्रचार करावा लागणार आहे. अशाचत आता निवडणुका पुढे ढकलण्याविषयी राज्य निवडणूक आयोगाने उत्तर दिले आहे.

निवडणूक आयोगाने काय म्हटलं?

राज्य निवडणूक आयोगाच्या सुत्रांनी सांगितले की, कायदेशीर सल्ला घेऊन आणि सर्व बाजूंचा विचार करून या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत . 17(1 ब) च्या तरतुदीनुसार एकाद्या उमेदवाराने कोर्टात अपील केल्यास उमेदवाराला अर्ज माघे घेण्यासाठी ठराविक वेळ देणं गरजेचं होतं. अन्यथा याचा संपूर्ण निवडणुकीवर याचा परिणाम झाला असता. यामुळे निवडणूक स्थगित करावी लागली असती, त्यामुळे ठराविक नगरपालिकांच्या आणि सदस्यांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.

ज्या नगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत तेथील 24 निवडणूक अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. आता ज्या ठिकाणी निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत त्या ठिकाणच्या उमेदवारांना 11 डिसेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे, याच दिवशी चिन्ह वाटप केले जाणार आहे. यासाठी मतदान 20 डिसेंबर रोजी होईल आणि मतमोजणी 21 डिसेंबरला होणार आहे.

या नगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकलल्या

  • बारामती
  • अंबरनाथ
  • फलटण
  • महाबळेश्वर
  • दिग्रस
  • पांढरकवडा
  • वणी
  • मंगळवेढा
  • कोपरगाव
  • देवळाली
  • नेवासा
  • पाथर्डी
  • घुग्गुस
  • अंजनगाव सुर्जी
  • रेणापूर
  • अंबरनाथ
  • मुखेड
  • धर्माबाद
  • वाशिम
  • रिसोड

सध्याचे चित्र काय आहे?

  • एकूण निवडणुकींची घोषणा – 288
  • बिनविरोध – 2
  • स्थगित – 24
  • उद्या मतदान – 262

कोणत्या विभागातील किती जागांसाठी निवडणूक रद्द ?

  • अमरावती – 187
  • छ. संभाजीनगर – 144
  • पुणे – 143
  • नाशिक – 120
  • कोकण – 69
  • नागपूर – 68

निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार – हर्षवर्धन सपकाळ

निवडणुका पुढे ढकलण्याच्या निर्णयावर बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळपास 10 वर्षानंतर होत आहेत. या निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात मात्र त्यातही गोंधळ निर्माण करण्यात आला. आधी अर्ज भरण्याची प्रक्रिया किचकट केली, मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ करण्यात आले. आता तर काही नगरपालिका व काही प्रभागांमधील निवडणुका स्थगित करून त्यांचा नवीन कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. 3 तारखेच्या निकालाचा या निवडणुकावर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे 3 तारखेचा निकालही 20 तारखेच्या मतदानानंतरच जाहीर करावा. आपलेच नियमही आयोगाला पाळता येत नाहीत हा कसला आयोग? आयोगाचा भोंगळ कारभार सुरु आहे.