शिवसैनिकांची कितीही इच्छा असली तरी उद्धव ठाकरे संजय पाटील यांच्या मुलीची पक्षातून हकालपट्टी करणार नाहीत, कारण..

Uddhav Thackeray : वडिलांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राजोल पाटील यांच्यावर देखील कारवाई व्हावी अशी मागणी जोर धरु लागली आहे. उद्धव ठाकरे स्वत: संजय पाटील यांच्याविरोधात बोलत आहेत. पण शिवसैनिकांची कितीही इच्छा असली तरी राजोल पाटील यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता कमी आहे.

शिवसैनिकांची कितीही इच्छा असली तरी उद्धव ठाकरे संजय पाटील यांच्या मुलीची पक्षातून हकालपट्टी करणार नाहीत, कारण..
Sanjay Patil-Rajool Patil
| Updated on: Jun 30, 2026 | 10:09 AM

सध्या महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील सहा खासदार फुटल्यामुळे त्यांच्या पक्षात मोठ्या प्रमाणात अस्वस्थता, संतापाची भावना आहे. उद्धव ठाकरे सध्या फुटीर खासदारांच्या मतदारसंघातील दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरे हे तिथे जाऊन जाहीर सभांमधून फुटलेल्या खासदारांवर तोंडसुख घेत आहेत. या दौऱ्याची सुरुवात उद्धव ठाकरे यांनी ईशान्य मुंबईपासून केली. ईशान्य मुंबईतील खासदार संजय दीना पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. संजय दीना पाटील हे पक्षांतर्गत नाराजीमुळे ठाकरे गटातून बाहेर पडल्याचं स्पष्ट झालं. ठाकरे गट सोडल्यानंतर संजय दीना पाटील आणि संजय राऊत यांच्यात बरीच शाब्दीक बाचाबाची झाली. परस्परांवर टीका करताना भाषेची मर्यादा राहिली नाही. त्यात संजय दीना पाटील यांनी एका पत्रकाराला धमकावलं, शिवीगाळ केली. त्यांच्या या वर्तनासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला माफी मागावी लागली.

आता ईशान्य मुंबईतील शिवसैनिकांकडून राजोल पाटील यांच्या पक्षातून हकालपट्टीची मागणी होत आहे. राजोल पाटील या खासदार संजय पाटील यांच्या कन्या आहेत. त्या ठाकरे गटाकडून राजकारणात सक्रीय आहेत. प्रभाग क्रमांक 114 मधून राजोल पाटील या नगरसेविका आहेत. उद्धव ठाकरे यांनी त्यांना तिकीट दिलं होतं. राजोल पाटिल यांच्या वडिलांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राजोलवर देखील कारवाई व्हावी अशी मागणी जोर धरु लागली आहे.

राजोल पाटील यांच्यावर कारवाई का होणार नाही?

ईशान्य मुंबईतील शिवसैनिकांकडून राजोल पाटील यांच्या हकालपट्टीची कितीही मागणी झाली, तरी पालिकेतील आकडेवारीमुळे राजोल यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता कमी आहे. आपण पक्षासोबत राहणार असं राजोल पाटील यांनी आधीच स्पष्ट केलं आहे. त्यासाठी त्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची भेट देखील घेतली होती. वडिलांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केल्याच्या प्रश्नावर त्यांनी घरात व्यक्ती स्वातंत्र्य, निर्णय स्वातंत्र्य असल्याचं उत्तर त्यांनी दिलं होतं.

उद्धव ठाकरे यांच्याकडे BMC मध्ये किती नगरसेवक?

सध्या मुंबई महानगरपालिकेत उद्धव ठाकरे गटाचे 65 नगरसेवक आहेत. नगरसेवकांना वेगवेगळ्या समित्यांचं वाटप झालं आहे, अशावेळी राजोल पाटील यांची पक्षातून हकालपट्टी केल्यास पालिकेतील समीकरणं बदलू शकतात. त्यामुळे शिवसैनिकांची कितीही इच्छा असली, तरी उद्धव ठाकरे त्यांच्यावर कारवाई करण्याची शक्यता कमी आहे. एखाद्यावेळी व्हीप बजावल्यानंतर नगसेवक अनुपस्थित राहिला किंवा नगरसेवकांनी पक्षविरोधी काम केल्यास हकालपट्टी केली जाते. सध्या तरी मुंबई महापालिकेत असा कुठलाही व्हीप बजावण्याची आवश्यकता नाहीय.

Follow Us