फोटो काढण्यावरून भरचौकात पोलिसांना जाब विचारणाऱ्या भंडाऱ्याच्या छोट्या वाघिणी वायरल..काय झालं..

भंडाऱ्यात 3 वर्षीय बालिकेवर अत्याचार झाल्याचं प्रकरण ताजं असताना सोशल मीडियावर शालेय विद्यार्थीनींचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. भंडारा येथे बस स्टॉपवर एका व्यक्तीने शालेय विद्यार्थिनींचे फोटो काढल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

फोटो काढण्यावरून भरचौकात पोलिसांना जाब विचारणाऱ्या भंडाऱ्याच्या छोट्या वाघिणी वायरल..काय झालं..
Buldhana Bandh
| Updated on: Aug 17, 2026 | 11:15 AM

भंडाऱ्यात 3 वर्षीय बालिकेवरील अत्याचाराचं प्रकरण ताजं असताना सोशल मीडियावर शालेय विद्यार्थीनींचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. भंडाऱ्यात विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून छेडछाडीविरोधात विद्यार्थिनींनी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले. 112 क्रमांकावर कॉल करूनही पोलिसांनी नराधमाला जागेवरच का चोप दिला नाही, असा संतप्त सवाल विद्यार्थीनींनी उपस्थित केल्याचं सोशल मीडियावरील एका व्हिडिओमध्ये दिसत आहे. “दोन दिवसांत न्याय मिळाला नाही तर आमच्या सुरक्षेची जबाबदारी प्रशासन घेणार का?” असा थेट सवाल त्यांनी केला.

भंडारा शहरात शालेय विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बस स्टॉपवर बसलेल्या विद्यार्थिनींचे मोबाईलमध्ये छेडछाडीच्या उद्देशाने फोटो काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थिनींनी थेट बस स्टॉपवरच ठिय्या मांडत ‘भंडारा बंद’ आंदोलन पुकारले. यावेळी मुलींनी घटनास्थळी आलेल्या पोलिसांना आणि उपस्थित नागरिकांना सुरक्षेच्या मुद्द्यावरून खडेबोल सुनावले, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

‘आमचे फोटो काढणाऱ्या नराधमाला जागेवरच का नाही मारले?’

आंदोलनादरम्यान एका विद्यार्थिनीने पोलिसांना थेट जाब विचारला, “आम्ही बस स्टॉपवर बसलो असताना एक माणूस समोरून आमचे फोटो काढत होता. आम्ही पोलिसांना पकडून दिले, पण पुढे काय केले? तोच माणूस आज पुन्हा आम्हाला नंबर मागत फिरत होता. पोलीस वेळेवर आले असे सांगतात, मग त्या नराधमाला तिथेच घालून का नाही मारले?” या प्रश्नावर पोलिसांनी उत्तर दिले की, “112 नंबरवरून आलेला कॉल थेट मुंबईला रेकॉर्ड होतो. त्यावर पोलिसांना तातडीने घटनास्थळी पोहोचणे बंधनकारक असते आणि पोलीस तिथे वेळेवर पोहोचले होते.” मात्र, पोलिसांच्या या उत्तराने विद्यार्थिनींचे समाधान झाले नाही.

गावातून येताना रोज सोसावा लागतो त्रास

दुसऱ्या एका विद्यार्थिनीने ग्रामीण भागातून येणाऱ्या मुलींची व्यथा मांडली. “आम्हाला गावातून येताना रोज त्रास सहन करावा लागतो. कधी बस वेळेवर मिळत नाही, म्हणून आम्हाला बस स्टॉपवर बसावे लागते. आम्हाला तिथे उगाच बसायची हौस नाही. आमचे आई-वडील आम्हाला शिक्षणासाठी शहरात पाठवतात, पण इथे आमची सुरक्षा रामभरोसे आहे,” अशा शब्दांत तिने आपला संताप व्यक्त केला.

‘दोन दिवसांत न्याय मिळाला नाही तर…’

विद्यार्थिनींचा संयम सुटल्याने त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या तमाशबीन नागरिकांनाही सुनावले. “तुम्हाला घरच्या आया-बहिणींची आठवण येत नाही का? हाताची घडी घालून उभे राहण्यापेक्षा खाली बसा!” असे म्हणत एका विद्यार्थिनीने थेट प्रशासकीय अधिकाऱ्याला सवाल केला, ‘साहेब, दोन दिवसांत आम्हाला न्याय मिळाला नाही, तर तुम्ही माझ्या आईला आणि बहिणीला तुमच्या घरात सुरक्षेसाठी ठेवणार का? हेच तुमचे प्रशासन आहे का?’

या आंदोलनामुळे काही काळ भंडाऱ्यातील वाहतूक आणि जनजीवन विस्कळीत झाले होते. विद्यार्थिनींच्या या आक्रमक पवित्र्यामुळे पोलीस प्रशासनाची प्रचंड तारांबळ उडाली असून, छेडछाड करणाऱ्या विकृतांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us