जरांगे पाटील राजकारणात येणार? रोहित पवार यांच्या त्या विधानाची एकच चर्चा
जे आज सामाजिक क्षेत्रामध्ये काही लोकांसाठी लढत आहेत ते कदाचित जानेवारीमध्ये राजकारणामध्ये येतील का काय असं सुद्धा आम्हाला वाटतंय. तेव्हा काय होईल ते त्यावेळेस आपल्याला बघावं लागेल.
मुंबई | 5 डिसेंबर 2023 : आरक्षणावरून दोन्ही बाजूचे समर्थक आमने सामने आलेत. वाशिममध्ये जरांगे पाटील यांना भुजबळ समर्थकांनी काळे झेंडे दाखवले. तर लातूरमध्ये भाजपच्या बावनकुळें विरोधात जरांगे पाटलांच्या समर्थकांनी आंदोलन केलंय. दुसरीकडे मागासवर्ग आयोगामध्ये सरकारच्या दबावाच्या आरोपातून राजीनामा सत्र सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. जरांगे पाटील यांची वाशिमच्या काटे गावात सभा होती. त्यावेळी भुजबळ समर्थकांनी काळे झेंडे दाखवून जरांगे विरोधात घोषणा दिल्या. त्याचवेळी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी खळबळजनक विधान केलंय. त्यावरून एकच चर्चा सुरु झालीय.
जरांगे पाटील यांना काळे झेंडे दाखविण्यात आले. त्यावरून जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ जास्तीचे आहेत. सध्या नाटकं करायला लागलाय. छगन भुजबळ तुझ्या कार्यकर्त्याला आमच्या विरोधात आंदोलन करायला लावत असशील. पण, आम्ही सध्या शांत आहेत हे लक्षात ठेव. तू जरा सबुरीने घे छगन भुजबळ. मला असलं दाखवून काय होत नाय. मी काय मंत्री नाय. तू शहाणपणाची भूमिका तरी घे असा हल्लाबोल केलाय.
त्यावर भुजबळ यांनीही पलटवार केला. ‘तू काय महाराष्ट्राचा नेता नाही झाला सगळ्यांना ऑर्डर करायला. इथे OBC सत्तावीस टक्के आहे. त्याच्यामध्ये भटके विमुक्त आहेत. सत्तावीस टक्क्यातला काही भाग जो आहे. तो त्यांना दिलेला आहे. त्याच्यामध्ये दुसरा माळी, तेली, कुणबी जाऊ शकत नाही. तुम्ही सगळं खाताय अरे अभ्यास कर बाबा. काय ते कसं कसं त्याची मांडणी आहे ती बघ काय आणि मग काय ते तुला काय सांगायचे प्रश्न तर विचारा ना आम्ही उत्तर देऊ ना त्याचं असं भुजबळ म्हणालेत.
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगातल्या काही सदस्यांनी सरकारमधीलच काही मंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. तर, काहींनी राजीनामे सुद्धा दिले आहेत. त्यात आता मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश आनंद निर्गुडे हे सुद्धा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा आहे. आयोगाच्या कामकाजात शासनाचा वाढता हस्तक्षेप हे त्याच कारण असल्याचं बोललं जातंय.
मराठा समाजाबरोबरच सर्वच समाजाच्या सर्वेक्षणावरून पडलेले दोन गट, OBC आरक्षणाबाबत आयोगाचे शपथ पत्र दाखल करण्यास विरोध. अशी अनेक कारणं राजीनाम्या मागे दिली जात आहेत. यापूर्वी मागासवर्ग आयोगातून प्राध्यापक संजीव सोनावणे, वकील बालाजी किल्लारीकर आणि प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी राजीनामा दिला.
दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी जे सध्या सामाजिक क्षेत्रात लोकांसाठी लढत आहेत. ते कदाचित जानेवारी महिन्यात राजकारणात येतील. असं विधान केलंय. मला असं वाटतंय की आजची महाराष्ट्राची परिस्थिती बघता काही लोकं जे आज सामाजिक क्षेत्रामध्ये काही लोकांसाठी लढत आहेत ते कदाचित जानेवारीमध्ये राजकारणामध्ये येतील का काय असं सुद्धा आम्हाला वाटतंय. तेव्हा काय होईल ते त्यावेळेस आपल्याला बघावं लागेल. असे ते म्हणाले. त्यांच्या या विधानाचा रोख हा जरांगे पाटील यांच्य्कडे असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळेच त्यांच्या या विधानाची एकच चर्चा राज्यात सुरु झालीय.