तुकाराम मुंढे राजकारणात येणार? मुंढेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले ‘राजकारण हे…’
महाराष्ट्राचे सर्वात कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळख असणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राजकारणात जाणार का? या प्रश्नावर स्पष्ट उत्तर दिलं आहे.

महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त आणि कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळखले जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे सध्या देशभरात चर्चेत आहेत. 25 मे रोजी FDA विभागाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी राज्यभरात कारवाईचा धडाका लावला आहे. रेस्टॉरंट्स, घाऊक विक्रेते तसेच क्विक डिलिव्हरी प्लॅटफॉर्मच्या सेंटरवर छापे टाकत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात आहे. काही ठिकाणी परवानेही रद्द करण्यात आले आहेत.
तुकाराम मुंढे यांच्या कामाच्या पद्धतीची सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. त्यांची थेट आणि स्पष्ट कार्यशैली पाहून अनेकजण देशाला मुंढेंसारख्या अधिकाऱ्यांसोबतच राजकारण्यांचीही गरज असल्याचे मत व्यक्त करत आहेत. त्यामुळेच आता एक प्रश्न चर्चेत आला आहे, तुकाराम मुंढे भविष्यात राजकारणात प्रवेश करणार का?
तुकाराम मुंढे भविष्यात राजकारणात प्रवेश करणार का?
तुकाराम मुंढे भविष्यात राजकारणात प्रवेश करणार का? या प्रश्नाचे उत्तर स्वत: तुकाराम मुंढे यांनी दिले आहे. एनडीटीव्ही प्रॉफिटला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी स्पष्ट केले की, राजकारणात येण्याचा त्यांचा कोणताही विचार नाही. एवढेच नाही तर राजकारण हे आपल्या स्वभावाला अनुरूप काम नसल्याचेही त्यांनी सांगितले.
‘माझ्यासारखा माणूस, जो अगदी सरळ आणि स्पष्ट बोलतो, तो राजकारणात स्थिरावू शकेल असं मला वाटत नाही’ असे मुंढे यांनी स्पष्ट केले. मुंढे यांच्या कार्यशैलीवर अनेकदा टीकाही केली जाते. काहीजण त्यांना त्यांच्या कठोर आणि थेट वागण्यामुळे घमंडी असल्याचे म्हणतात. याबाबतही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
‘राजकारण हे माझ्या बसचं काम नाही’
‘घमंडी असणे आणि आपली गोष्ट थेटपणे सांगणे यामध्ये खूपच फरक आहे. हे काही वेगळं नाही. माझा स्वभावच तसा आहे असे त्यांनी सांगितले. आपण परिस्थितीनुसार आपली भूमिका बदलण्यापेक्षा जे योग्य आहे ते स्पष्टपणे सांगण्यावर भर देतो असा संदेश त्यांच्या वक्तव्यातून दिसून येतो. सध्या FDAमधील त्यांच्या धडाकेबाज कारवाईमुळे तुकाराम मुंढे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. मात्र, राजकारणात प्रवेश करण्याबाबत त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली असून, ‘राजकारण हे माझ्या बसचं काम नाही’, असेच त्यांनी आपल्या वक्तव्यातून सांगितले आहे.