
राज्यात गेल्या काही आठवड्यांपासून मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीबाबत चर्चा रंगली आहे. मराठीच्या मुद्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे एकाच मंचावर आले होते. त्यानंतर या दोन्ही पक्षांच्या युतीच्या चर्चांना आणखी जोर आला आहे. याबाबत काँग्रेसनेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या उपस्थितीत पुण्यात चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित आहेत. या बैठकीत राज्यातील सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. तसेच आगामी महापालिका निवडणूकीबाबतही चर्चा झाली आहे. या बैठकीत मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीबाबतही चर्चा झाली आहे.
मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीबाबत महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना चेन्नीथला यांनी म्हटलं की, ‘दोन भाऊ एकत्र येत असतील आम्हाला काही अडचण नाही, मात्र मनसेला आघाडीत घ्यायचं की नाही तो निर्णय आम्ही चर्चेनंतर घेऊ’. तसेच विजय वडेट्टीवार यांनी म्हटले की, ‘दोन भाऊ एकत्र येण्याची चर्चा सुरु आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत त्यांना एकत्र यायचं असेल तर येऊ द्या’
शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडीचा भाग आहे. आता रमेश चेन्निथला यांच्या विधानाने काँग्रेसला मनसे-ठाकरे गटाच्या युतीवर कोणताही आक्षेप नाही असं स्पष्ट होत आहे. मात्र हे दोन्ही पक्ष एकत्र आले तर मनसेला महाविकास आघाडीत स्थान मिळणार की नाही ते अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मनसे-शिवसेना युती झाली आणि काँग्रेसने किंवा इतर पक्षांनी मनसेला महायुतीत घेण्यास नकार दिला, तर मनसेची चिंता वाढण्याची शक्यता आहे. मनसेला आघाडीत जागा मिळाली तर त्यांनी महाविकास आघाडीच्या जागावाटपात स्थान मिळेल, मात्र मनसे महाविकास आघाडीत सामील न झाल्यास शिवसेनेला आपल्या कोट्यातून मनसेला जागा द्याव्या लागणार आहे. त्यामुळे पेच आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकारणात नेमकं काय घडणार हे येणारा काळच ठरवणार आहे.