
सध्याच्या काळात संतान प्राप्तीसाठी अनेक जोडप्यांकडून विविध प्रयत्न केले जातात. तर गर्भधारणेच्या वेळी अनेक महिलांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. परंतु कधी कधी देवाकडून जणू आशीर्वादांचा वर्षावच होऊ लागतो. असंच काहीसं सातारा जिल्ह्यात घडलं आहे. साताऱ्यातील जिल्हा रुग्णालयात ही अनोखी घटना घडली आहे. कोरेगाव तालुक्यातील 27 वर्षीय तरुणीने एकाच वेळी दोन-तीन नव्हे तर चार बाळांना जन्म दिला आहे. काजल विकास खाकुर्डिया असं या तरुणीचं नाव आहे. विशेष म्हणजे याआधी पाच वर्षांपूर्वी काजलने तीन बाळांना जन्म दिला होता. म्हणजेच आता तिच्या पदरात दोन-चार नव्हे तर सात अपत्य आहेत. या घटनेनं डॉक्टरांपासून नातेवाईकांपर्यंत सर्वांनाच थक्क करून सोडलं आहे.
एकाच वेळी चार बाळांना जन्म जेणारी काजल ही मूळची गुजराजची आहे. ती सध्या सासवडमध्ये राहत असून साताऱ्यातील तिच्या माहेरी बाळंतपणासाठी आली होती. काजलचा पती विकास खाकुर्डिया गवंडी म्हणून काम करतो. सी-सेक्शनद्वारे काजलची डिलिव्हरी करण्यात आली आहे. सुदैवाने या डिलिव्हरीदरम्यान कोणत्याही अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे डिलिव्हरीनंतर आई आणि तिच्या चारही बाळांची प्रकृती ठणठणीत आहे. खाकुर्डिया यांच्या घरात आता दोन-चार नव्हे तर सात बाळांचं संगोपन होणार आहे. या घटनेनं परिसरातील नागरिकसुद्धा चकीत झाले आहेत.
डॉ. देसाई, डॉ. सलमा इनामदार, डॉ. खडतरे, डॉ. झेंडे, डॉ. दिपाली राठोड आणि संपूर्ण वैद्यकीय पथकाने काजलची सुरळीत डिलिव्हरी पार पाडली.. एका मातेच्या पोटी इतक्या लहानग्यांचा जन्म झाल्यामुळे जिल्हा रुग्णालयात एकप्रकारे आनंदसोहळाच पाहायला मिळाला. अशी दुर्मिळ प्रसूती जिल्हा रुग्णालयात पहिल्यांदाच झाल्याने डॉक्टरांनीही आनंद व्यक्त केला. दरम्यान अशा पद्धतीने एकाच वेळी चार बाळांना जन्म देण्याची ही काही पहिलीच घटना नाही. याआधीही अशा प्रसुतीच्या बातम्या समोर आल्या आहेत. सध्या आयव्हीएफ, सरोगसी आणि गरोदरपणासाठी इतर अनेक प्रयत्न अनेकांकडून केले जात असताना अशा पद्धतीने एकाच वेळी चार मुलांचा जन्म होण्याची घटना चमत्कारापेक्षा कमी नाही.