प्रसूत महिलेवर 7 दिवस रुम झाडण्याची वेळ, नवऱ्याने टॉयलेट साफ केलं; सोलापुरातील संतापजनक प्रकार!
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकारानंतर आता माढा ग्रामीण रुग्णालयात एक प्रकार चर्चेचा विषय ठरतोय.

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालायात एका महिलेच्या प्रसूतीसाठी तब्बल 10 लाख रुपये अनामत रुक्कम भरण्याचे प्रकरण चांगलेच गाजले आहे. वेळेत उपचार न मिळाल्याने या महिलेचा अन्य रुग्णालयात नंतर दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेस जबाबदार असलेल्या डॉक्टरांवर तसेच इतरांवर कठोरातील कठोर करवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. असे असतानाच आता सोलापूर जिल्ह्यातील माढा येथून अशाच प्रकारचा गंभीर प्रकार समोर आला आहे. येथे प्रसूत झालेल्या एका महिलेला तिची रुम साफ करायची वेळ आली आहे. विशेष म्हणजे या महिलेच्या पतीने एकूण सात दिवस स्वच्छतागृह साफ केले आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार घडलेला प्रकार हा माढा ग्रामीण रुग्णालयात घडला आहे. या रुग्णालयात माढा तालुक्यातील खैराव गावाच्या हेमा शैलेश धडे यांचा प्रसूत झाल्या होत्या. या रुग्णालयात त्या एकूण सात दिवस होत्या. या सातही दिवस त्यांच्यावर स्वत: रुम साफ करण्याची वेळ आली आहे. तर त्यांच्या पतीनेच रुममधील टॉटलेट साफ केले आहे. हेमा शैलेश धडे यांच्या कुटंबींयांनीच हा विदारक अनुभव सांगितला आहे. हेमा धडे यांचे शिझर झाले होते. या शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या पोटाला टाके घालण्यात आले होते. त्यांना प्रचंड त्रास होत असतानाही त्यांना त्यांच्या रुमची साफसफाई करावी लागली. रुमची स्वच्छता करण्यासाठी कर्मचारीच न आल्याने त्यांच्यावर ही वेळ आली आहे.
संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी
दरम्यान, हा विदारक अनुभव आल्यानंतर माढा ग्रामीण रुग्णालयाच्या कामचुकार कर्मचाऱ्यांवर तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारलाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे पदाधिकारी शंभू साठे यांनी केली आहे. पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडलेला प्रकार ताजा असतानाच सोलापूरच्या माढा ग्रामीण रुग्णालयातला हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
दीनानाथ रुग्णालयात नेमकं काय घडलं?
काही दिवसांपूर्वी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार घडला होता. या रुग्णालयात तनिषा भिसे नावाची महिला प्रसूतीसाठी आली होती. मात्र या प्रसूतीदरम्यान महिलेच्या कुटुंबीयांना तब्बल 10 लाख रुपये अनामत रक्कम म्हणून मागितले होते. त्यानंतर या महिलेला अन्य रुग्णालयात पाठवण्यात आले होते. या महिलेने नंतर जुळ्यांना जन्म दिला. मात्र या महिलेचा यात मृत्यू झाला. मात्र हे प्रकरण समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर संताप व्यक्त करण्यात आला. या प्रकरणात आरोप करण्यात आलेल्या डॉ. सुश्रुत घैसास यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. राज्य सरकारने या प्रकरणी चौकशी समिती नेमली असून याबाबत कठोर कारवाई केली जाईल, अशी भूमिका घेतली आहे.
