
यवतमाळ : लहान मुलांचा खोकला दूर व्हावा यासाठी दिल्या जाणाऱ्या कफ सिरप या औषधाबाबत सध्या वेगवेगळ्या चर्चा चालू आहेत. मध्य प्रदेशमध्ये तर हे औषध घेतल्याने अनेक मुलांचा मृत्यू झाला आहे. दोन वर्षांपेक्षा लहान मुलांना हे औषध देऊ नये, असे केंद्र सरकारतर्फे सांगण्यात आले आहे. दरम्यान, आता यवतमाळमध्येही असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. येथे एका सहा वर्षाच्या मुलाला खोकल्याचा त्रास सुरू झाला होता. सुरुवातीला त्याला बरे वाटत होते. नंतर मात्र अचानकपणे त्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळेच त्याला देण्यात आलेल्या औषधांमुळे तर त्याचा मृत्यू झालेला नाही ना? अशी शंका उपस्थित केली जात आहे. सरकारने या प्रकरणाची दखल घेतली असून अन्न व औषध प्रशासनं विभागानं संबंधित मेडिकलमधून पाच औषधांचे नमुने जप्त करून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत.
शिवमच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहिती नुसार शिवमचे वडील सैन्यात असून बरेली येथे कर्तव्यावर आहेत. दसऱ्यानिमित्त ते गावी आले असतांना 4 ऑक्टोबर रोजी शिवमला ताप, सर्दी, खोकला झाला. त्याच्यावर यवतमाळ येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. दोन दिवस त्याला बरं वाटलं. मात्र नंतर 6 तारखेला शिवमची प्रकृती खालावली. त्यानंतर त्याला पुन्हा त्याच खासगी हॉस्पिटलमध्ये नेलं असता संबंधित रुग्णालय प्रशासनाने शासकीय रुग्णालयात जाण्यास सांगितलं. मात्र शासकीय रुग्णालयात नेले असता शिवमला मृत घोषित करण्यात आलं.
सहा वर्षाच्या शिवमला सर्दी खोकल्याचा त्रास झाल्याने सुरुवातीला त्याला यवतमाळच्या खासगी रुग्णालयात नेले होते. त्यावेळी डॉक्टरांनी औषध लिहून दिले होते. औषधी घेतल्यावरही त्रास कमी न झाल्यामुळे दोन दिवसांनी परत डॉक्टरांना दाखविले. त्यांनी पुन्हा औषध दिले. हे औषध सुरू असताना अचानक तो बेशुद्ध झाला. खासगी रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्याला जिल्हा रुग्णालयात पाठविले. जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. औषधांमुळे शिवमचा मृत्यू झाल्या असावा अशी शंका आहे. परंतु शविच्छेदन अहवाल आणि औषधांचा अहवाल आल्यावरच नेमका काय प्रकार झाला हे कळेल असे शिवमच्या कुटुंबीयांनी सांगितले.
या घटनेनंतर अन्न व औषध प्रशासनं विभागानं संबंधित मेडिकलमधून पाच औषधांचे नमुने जप्त करून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. शिवमच्या मृत्यू आधी दोन-चार दिवस त्याला सर्दी खोकल्याचे औषधी देण्यात आले होते. त्या सात औषधांचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तर खबरदारीचा उपाय म्हणून या औषधाचा वापर आणि वितरण थांबवण्याचे आदेश शासनाने दिला आहे. अन्न व औषधी प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त मिलिंद काळेश्वरकर यांनी तशी माहिती दिली आहे.