Video | भर उन्हात कानटोप्या, स्वेटर घालून पेट्रोल दरवाढी विरोधात आंदोलन, युवा सेनेच्या कार्यकर्त्यांची अनोखी स्टाईल

| Updated on: Mar 01, 2021 | 4:17 PM

थंडीमुळे पेट्रेल आणि डिझेलचे दर वाढल्याचा जावईशोध केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान लावल्याचा आरोप करत युवा सेनेने अनोखे आंदोलन केले आहे. (Yuva Sena Thane Protest)

Video | भर उन्हात कानटोप्या, स्वेटर घालून पेट्रोल दरवाढी विरोधात आंदोलन, युवा सेनेच्या कार्यकर्त्यांची अनोखी स्टाईल
युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी अनोखं आंदोलनं केले.
Follow us on

ठाणे: थंडीमुळे पेट्रेल आणि डिझेलचे दर वाढल्याचा जावईशोध केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान लावल्याचा आरोप करत युवा सेनेने अनोखे आंदोलन केले आहे. युवासेनेने ठाणे येथील एका पेट्रोल पंपावर आगळे वेगळे आंदोलन केले. भर उन्हात कानटोपी, स्वेटर, हातमोझे परिधान करून युवासेनेचे कार्यकर्ते पेट्रोल पंपावर पोहोचले. त्यांनी वाहनात पेट्रोल भरुन घेतयुवासेना विस्तारक राहुल लोंढे यांच्या नेतृत्वाखाली प्रतीकात्मक आंदोलन केले. पेट्रोलचे दर शंभरी पर्यंत पोहोचले असल्याने देशाच्या पंतप्रधानांना देण्यासाठी एक आकर्षक ट्रॉफी पेट्रोल पंप मालकाकडे भेट देण्यात आली. ( Yuva Sena Protest against fuel rates hike in unique way at Thane)

पेट्रोल आणि डिझेल दरवाढीवरुन संताप

देशात सर्वत्र पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या दरात प्रचंड वाढ झाली असून दिवसेंदिवस यात मोठी वाढ होत आहे. इंधनाच्या वाढत्या किमतीवरुन देशात सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. दुसरीकडे मात्र मोदी सरकारमधील पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान मात्र थंडीमुळे हे दर वाढ असल्याची बडबड करून देशाची दिशाभूल करत आहेत, असा आरोप युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

उद्धव ठाकरेंच्या आवाहनामुळे मोजक्या पदाधिकाऱ्यांसह आंदोलन

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ ठाण्याच्या युवासेनेने शहरातील मध्यवर्थी असलेल्या पेट्रोल पंपावर जावून अनोखे आंदोलन केले. यावेळी राहुल लोंढे यांच्यासह युवासेना पदाधिकारी उपस्थित होते . मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत काही मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले.

काँग्रेसचं इंधन दरवाढीवर मुंबईत आंदोलन

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात इंधन दरवाढी विरोधात सायकल आंदोलन करण्यात आले. काँग्रेसचे सर्व मंत्री, आमदार आणि नेते आज सकाळी मंत्रालयासमोरील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर जमला. यावेळी त्यांच्या हातात इंधन दरवाढीचे निषेध नोंदवणारे फलक होते. त्यावर, ‘अक्कड बक्कड बंबे बो, 80, 90 पुरे 100’, ‘आपण पुन्हा आदिमानवांच्या दिशेने प्रवास करत आहोत का?’, असा मजकूर लिहिलेला होता. यावेळी काँग्रेस नेत्यांनी महात्मा गांधींना अभिवादन केल्यानंतर सायकलवरून विधानभवनाच्या दिशेने प्रवास सुरू केला. यावेळी नाना पटोले यांच्यासह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार प्रणिती शिंदे, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्यासह काँग्रेसचे सर्वच आमदार उपस्थित होते.

राज्यातील आजचे पेट्रोलचे दर

मुंबई – 97.47 प्रतिलिटर

ठाणे – 97.45 प्रतिलिटर

पुणे – 97.35 प्रतिलिटर

नागपूर – 98.08 प्रतिलिटर

सांगली – 97. 73 प्रतिलिटर

सातारा – 97.94 प्रतिलिटर

कोल्हापूर – 97.78 प्रतिलिटर

परभणी – 99.68 प्रतिलिटर

दररोज 6 वाजता किमती बदलतात

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.

संबंधित बातम्या:

Petrol Diesel Rate Today : महिन्याच्या पहिल्याच दिवशी काय आहेत इंधनाचे दर, वाचा तुमच्या शहरातील ताजे भाव

आपण पुन्हा आदिमानवांच्या दिशेने जात आहोत का?; काँग्रेसची सायकल रॅली

( Yuva Sena Protest against fuel rates hike in unique way at Thane)