
Maharashtra ZP Election Results : राज्यातील मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे निकाल आता हळूहळू स्पष्ट होण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांचे सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. या निवडणुकीत प्रस्थापित नेत्यांच्या नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणावर विजय मिळवत आपले राजकीय वर्चस्व सिद्ध केले आहे. पुणे, सोलापूर, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये दिग्गजांच्या वारसांनी बाजी मारली आहे.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत प्रस्थापित नेत्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी आपले वर्चस्व कायम राखले आहे. पुणे, सोलापूर, परभणी आणि रत्नागिरी या जिल्ह्यात सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी यांच्यात अटीतटीची लढत पाहायला मिळाली.
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव मतदारसंघात माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. पारगाव जरकवाडी गटातून त्यांचे पुतणे विवेक वळसे पाटील यांनी तिसऱ्या फेरी अखेर २१३० मतांची निर्णायक आघाडी घेत विजयावर शिक्कामोर्तब केले. तर दुसरीकडे, पुरंदर तालुक्यात माजी आमदार बापूसाहेब पठारे यांची कन्या रूपाली झेंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर विजय संपादन केला. विशेष म्हणजे, पुरंदरमध्ये राष्ट्रवादीचे दोन्ही पंचायत समिती सदस्यही विजयी झाले आहेत. त्यामुळे पुरंदर तालुक्यावर पक्षाची पकड अधिक मजबूत झाली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील मानेगाव जिल्हा परिषद गटाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. येथे माजी मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे आणि शिवाजीराव सावंत यांचे पुत्र पृथ्वीराज सावंत यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. पृथ्वीराज सावंत यांनी ६ हजार ८०० मतांच्या विक्रमी मताधिक्याने प्रतिस्पर्ध्याचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला.
तसेच, सोलापूर जिल्ह्यातच भाजपचे नेते राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांनीही जिल्हा परिषद निवडणुकीत विजय मिळवत राजकीय क्षेत्रात यशस्वी पदार्पण केले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर विधानसभा मतदारसंघातील असगोली जिल्हा परिषद गटात आमदार भास्कर जाधव यांचे पुत्र विक्रांत जाधव यांनी पहिल्या फेरीपासूनच ५७१ मतांची आघाडी घेत विजयाकडे कूच केली. तर रायगडमध्ये आमदार भरत गोगावले यांचे चिरंजीव विकास गोगावले यांनीही प्रतिस्पर्ध्याला धूळ चारत विजय मिळवला आहे.