मोठी बातमी! भाजपाची डोकेदुखी वाढली, काँग्रेसने जिल्हा परिषद निवडणुकीसाठी घेतला मोठा निर्णय

ZP Election : जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाला टक्कर देण्यासाठी काँग्रेसने मोठा निर्णय घेत प्रकाश शेंडगे यांच्या नेतृत्वाखालील ओबीसी बहुजन पक्षासोबत आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे.

मोठी बातमी! भाजपाची डोकेदुखी वाढली, काँग्रेसने जिल्हा परिषद निवडणुकीसाठी घेतला मोठा निर्णय
Congress OBC
Image Credit source: X
| Updated on: Jan 19, 2026 | 11:07 PM

राज्यातील महानगर पालिकांच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता राजकीय पक्षांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तयारीला सुरूवात केली आहे. 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी 5 फेब्रुवारीला मतदान पार पडणार आहे, तर 7 फेब्रुवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. अशातच आता या निवडणुकीत भाजपाला टक्कर देण्यासाठी काँग्रेसने मोठा निर्णय घेत प्रकाश शेंडगे यांच्या नेतृत्वाखालील ओबीसी बहुजन पक्षासोबत आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. ही एक वैचारिक आघाडी असून आगामी जिल्हा परिषद निवडणुका एकत्रित लढू अशी घोषणा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

काँग्रेस आणि ओबीसी बहुजन पक्षाची आघाडी

समोर आलेल्या माहितीनुसार, ओबीसी बहुजन पक्षाचे नेते प्रकाश आण्णा शेंडगे यांनी त्यांचे सहकारी चंद्रकांत बावकर, जे. टी. तांडेल, पांडुरंग मिरगळ यांनी टिळक भवन येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांसोबत सविस्तर चर्चा केली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आघाडीची घोषणा केली. यावेळी बोलताना सपकाळ म्हणाले की, ओबीसी बहुजन आघाडीने काँग्रेससोबत काम करण्याचा निर्णय घेतला त्याचे मी स्वागत करतो. ही आघाडी केवळ सत्तेसाठी नसून एका व्यापक भूमिकेतून सामाजिक न्यायासाठी झाली आहे.

ज्यांची जेवढी लोकसंख्या तेवढी भागिदारी ही काँग्रेसची भूमिका – सपकाळ

पुढे बोलताना सपकाळ म्हणाले की, ‘राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणनेची आग्रही मागणी केल्यानंतर मोदी सरकारला त्याचा निर्णय घ्यावा लागला पण अजून ही जातनिहाय जनगणना झालेली नाही. ज्यांची जेवढी लोकसंख्या तेवढी भागिदारी ही काँग्रेसची भूमिका आहे. राहुल गांधी यांच्या या भूमिकेला सर्व समाजातून पाठिंबा मिळत आहे. धनगर, ओबीसी समाजाचे योग्य प्रतिनिधित्व असावे यावर भर दिला जाईल.’

फडणवीस यांनी फसवणूक केली – सपकाळ

हर्षवर्धन सपकाळ यांनी पुढे बोलताना म्हटले की, ‘भाजपाची सत्ता आल्यावर पहिली सही धनगर समाजाच्या आरक्षणाची करेन असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीमध्ये 2014 साली दिले होते पण आजपर्यंत त्याची पूर्तता केलेली नाही. फडणवीस यांनी धनगर, ओबीसी, मराठा, आदिवासी समाजाची आरक्षणाच्या नावाखाली फसवणूक केली आहे. जाती जातीत भांडणे लावण्याचे काम त्यांनी केले आहे. या समाजाचा भाजपा व फडणवीस यांच्यावरचा विश्वास उडाला आहे.

ओबीसी आरक्षणाचे लचके तोडले जात आहेत – शेंडगे

प्रकाश शेंडगे यांनी म्हटले की, ‘ओबीसी आरक्षणाचे लचके तोडण्याचे काम केले जात असून 27 टक्के आरक्षणावरही घाला घातला जात आहे. जीआर वर जीआर काढले जात आहेत पण कोणत्याच समाजाला त्याचा फायदा होत नाही. ओबीसी समाजाला न्याय मिळावा यासाठी स्वतंत्र पक्षाची स्थापना करुन समविचारी पक्षाशी आघाडी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जातनिहाय जनगणनेची भूमिका घेतल्याबद्दल राहुल गांधी यांचे आम्ही आभार मानतो.