
राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेत राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितींच्या निवडणुकीची घोषणा केली आहे. या निवडणुकीसाठी 5 फेब्रुवारीला मतदान पार पडणार असून 7 तारखेला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. निवडणूक आयोगाने या निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम जाहीर केला आहे. कोकण, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर या विभागात ही निवडणूक पार पडणार आहे. कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समितींसाठी ही निवडणूक होणार याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची घोषणा करताना म्हटले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पंचायत समिती आणि जिल्हा परिषद 50 टक्केपेक्षा कमी आरक्षण आहे. त्यात निवडणूक होणार आहे. एकूण 12 जिल्हा परिषदा, 125 पंचायत समितीतींसाठी निवडणूक होणार आहे. कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्हा परिषदांसाठी मतदान पार पडणार आहे. पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्हा परिषदांसाठी निवडणूक होणार आहे. संभाजीनगर विभागातील संभाजीनगर, परभणी, धाराशीव व लातूर या जिल्हा परिषदांसाठी निवडणूक पार पडणार आहे.
निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे म्हणाले की, या निवडणुकीत प्रत्येक मतदारांना दोन मते द्यायची आहेत. एक मत जिल्हा परिषद आणि दुसरं मत पंचायत समितीसाठी द्यायचे आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया ऑफलाईन असणार आहे. नामनिर्देशन प्रक्रिया महापालिकेसारखीच ऑफलाईन असेल. ज्या जागा राखीव आहेत. त्याठिकाणी जातवैधता प्रमाणपत्र पडताळणी आवश्यक आहे. निवडून आल्यावर सहा महिन्यात जातप्रमाणपत्र द्यावं लागेल. नाही दिलं तर त्याची निवड रद्द होईल.