बालभारती वाद : जे शिक्षण आमदाराच्या मुलाला, तेच गरिबाच्या पोराला हवं : बच्चू कडू

बालभारती पुस्तकातील अंकवाचनातील बदलावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. शिक्षक आमदार कपिल पाटील आणि प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं.

बालभारती वाद : जे शिक्षण आमदाराच्या मुलाला, तेच गरिबाच्या पोराला हवं : बच्चू कडू

मुंबई : बालभारती पुस्तकातील अंकवाचनातील बदलावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. शिक्षक आमदार कपिल पाटील आणि प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं. “नवीन बालभारती पुस्तक आले आहे, त्या पुस्तकातील पाढ्याची भाषा बदलून मराठी भाषा मारण्याचा कट या सरकारचा आहे. भाषेचे इंग्रजीकरण करायचा प्रयत्न सुरु आहे. हे मराठी भाषेवर आलेले भयंकर संकट आहे, अशी टीका शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी केली. तर शिक्षणाचा दर्जा सुधारा. जुन्या विनोदाने किती घाण केली आहे, आता नवीन शिक्षणमंत्री किती घाण करेल हे पाहावे लागेल. विनोद तावडे यांनी जी घाण निर्माण केली ती घाण साफ नवीन शिक्षणमंत्री करणार का? असा सवाल कडू यांनी उपस्थित केला.

इयत्ता दुसरीच्या गणिताच्या पुस्तकात अंकवाचनाची पद्धत बदलली आहे. एकवीसऐवजी वीस एक, एकसष्ठऐवजी 60 एक अशी नवी पद्धती अवलंबण्यात येणार आहे. याबाबत शिक्षण क्षेत्रातून टीका होत आहे.

कपिल पाटील यांचं टीकास्त्र

याबाबत कपिल पाटील म्हणाले, “मराठी भाषेचा पाढा बदलून टाकायचा आणि मराठी संस्कृती मारून टाकायची असा विचार असल्याचे दिसून येत आहे. ही कल्पना कुणाच्या डोक्यात आली याचा शोध घ्यायचा आहे. मी अनेक भाषा तज्ज्ञांशी याबाबत चर्चा केली. परंतु हे नवीन शास्त्र हे कोणत्याच मराठी संस्कृतीत बसत नाही”

शिक्षणामध्ये जे विनोद झाले त्याचे नवीन आव्हान आता नव्या शिक्षणमंत्र्यावर आहे. मराठी अभिजात भाषा करायला हे निघाले आणि दुसरीकडे हे भाषा मारण्याचे काम करत आहेत. पाढा बदलायचा म्हणजे मराठी संस्कृती मारायची असे होते. सगळं बदलायचे आहे तर मराठी फेकून द्या असं यांचं धोरण आहे, अशी टीका कपिल पाटील यांनी केली.

बालभारतीची नवीन कितीही पुस्तके असली तरी ती फेकून द्यावी, कितीही खर्च झाला तरी चालेल कारण संख्याचे उच्चार बदलणे हे चुकीचे आहे, असं कपिल पाटील म्हणाले.

बच्चू कडू यांचा हल्लाबोल

शिक्षणाची खरी गरज ग्रामीण भागात जास्त आहे. गोरगरीब मजूर यांच्या मुलांना खरं शिक्षण मिळत नाही. एकाच वर्गात चार चार इयत्ता भरवल्या जातात आणि शिक्षक मात्र एकच असतो. शिक्षण समान स्थरावर देण्याची गरज आहे. तरच गोरगरिबांना दर्जेदार शिक्षण मिळेल, असं आमदार बच्चू कडू म्हणाले.

संख्या साक्षेप होऊन फार काही बदलणार नाही. जिल्हा, तालुका परिसरामध्ये काही ठिकाणी शाळा उपलब्ध नाही. शिक्षण समान भेटणार का? जे आमदाराच्या पोराला शिक्षण भेटते ते गरिबांच्या मुलाला भेटेल का? असा सवाल बच्चू कडू यांनी उपस्थित केला.

शिक्षणाचा दर्जा सुधारा. जुन्या विनोदाने किती घाण केली आहे, आता नवीन शिक्षणमंत्री किती घाण करेल हे पाहावे लागेल. विनोद तावडे यांनी जी घाण निर्माण केली ती घाण साफ नवीन शिक्षणमंत्री करणार का? असा सवाल कडू यांनी उपस्थित केला.

संबंधित बातम्या 

बालभारतीचे भलते प्रयोग, ‘एकवीस’ऐवजी ‘वीस एक’ 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *