अखेर निर्णय झालाच… 17 बंडखोर खासदार भाजपमध्ये जाणार; राजकीय घडामोडींना वेग
एनसीपीआयचे 17 बंडखोर खासदार दुर्गा पूजेपूर्वी भाजपमध्ये सामील होणार, अशी माहिती खासदार जगदीश चंद्र बसुनिया यांनी दिली आहे. तीन अल्पसंख्याक खासदार थेट भाजपमध्ये जाणार नसून, ते एनडीएला पाठिंबा देतील. या राजकीय घडामोडींमुळे कूचबिहारमध्ये टीएमसी कार्यालयाची जाळपोळ झाली, तर बसुनियांविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप करत निदर्शने झाली.

राजधानी दिल्लीत सर्वात मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. ममता बॅनर्जी यांच्या पक्षातून बंडखोरी करून नॅशनलिस्ट सिटिजन पार्टी ऑफ इंडिया (NCPI)मध्ये सामील झालेल्या 17 खासदारांबाबतची मोठी अपडेट समोर आली आहे. एनसीपीआयचे खासदार जगदीश चंद्र बर्मा बसुनिया यांनी या खासदारांबाबत मोठं विधान केलं आहे. दुर्गा पूजेच्या आधीच हे सर्व खासदार एनसीपीआयमधून भाजपमध्ये सामील होणार आहेत, असं बसुनिया यांनी म्हटलं आहे. मात्र, भाजपमध्ये सामील होणाऱ्या खासदारांमध्ये तीन अल्पसंख्याक खासदारांचा समावेश नाही.
एका वृत्त वाहिनीशी बोलताना जगदीश चंद्र बर्मा बसुनिया यांनी हा दावा केला आहे. खासदार अबू ताहिर आणि खलीलूर रहमान यांना वेगवेगळी खाती दिली जाणार आहेत. ते एनडीएला पाठिंबा देतील. त्यांच्या मतदारसंघात सर्वाधिक अल्पसंख्याक क्षेत्र आहेत. त्यामुळे ते थेट भाजपमध्ये जाणार नाहीत. त्याने आम्हाला काही अडचण होणार नाही, असं बसुनिया यांनी म्हटलं आहे.
भाजपनेच आम्हाला एनसीपीआयमध्ये आणलं होतं. पण आम्हाला भाजपमध्ये जायचं होतं. आता सर्व काही गोष्टी व्यवस्थित झाल्या तर आम्ही 20 ते 17 खासदार दुर्गा पूजेच्या आधीच भाजपमध्ये प्रवेश करू, असंही त्यांनी स्पष्ट केलं. बसुनिया हे सुद्धा टीएमसीमधून एनसीपीआयमध्ये आले आहेत.
टीएमसी कार्यालयाची जाळपोळ
जगदीश चंद्र बर्मा बसुनिया हे कूचबिहार येथील खासदार आहेत. रविवारी पोलीस संरक्षणात ते आपल्या घरी आले. बसुनिया घरी आल्याचं कळताच राज्यात राजकीय वातावरण तापलं. त्यानंतर सिताई बस स्टँड परिसरातील टीएमसीच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. टीएमसीच्या कार्यालयाला आग लावण्यात आली. तर, स्थानिक कार्यकर्ते आणि भाजपच्या एका वर्गाने बसुनिया यांच्या घरासमोर जोरदार निदर्शने करून निषेध नोंदवला.
भ्रष्टाचाराचे आरोप
गेल्या 15 वर्षापासून बसुनिया हे राजकीय बळाचा चुकीचा वापर करत आहेत. त्यांनी प्रचंड भ्रष्टाचार केला असून उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती जमवली आहे, असा आरोप आंदोलकांनी केला. बसुनिया यांनी राईस मिलसहीत अनेक मोठ्या व्यावसायिक संस्था उभ्या केल्याचा आरोपही आंदोलकांनी केला आहे. बसुनिया यांनी टीएमसीसोडून एनसीपीआयमध्ये प्रवेश केल्यामुळेही त्यांच्यावर आंदोलकांनी हल्लाबोल केला आहे.
बसुनिया पूर्वी फॉरवर्ड ब्लॉकमध्ये होते. त्यानंतर ते तृणमूलमध्ये आले. आता एनसीपीआयमधून भाजपमध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना आणि त्याच्या समर्थकांना भाजप स्वीकार करणार नाही, असं आंदोलकांनी म्हटलं आहे. दरम्यान, या घटनेनंतर सिताई येथील राजकीय वातावरण अधिकच तापलं आहे.