2025 भारताच्या विकासाच्या प्रवासातील निर्णायक पर्व, एक आढावा

2025 हे भारताच्या विकासाच्या प्रवासातील एक निर्णायक पर्व ठरले आहे. पायाभूत सुविधांच्या प्रत्येक क्षेत्रात, रेल्वे, रस्ते, विमान वाहतूक, सागरी आणि डिजिटल, अशा सर्वच क्षेत्रातील पायाभूत सुविधांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे.

2025 भारताच्या विकासाच्या प्रवासातील निर्णायक पर्व, एक आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदी
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Dec 24, 2025 | 10:12 PM

2025 हे भारताच्या विकासाच्या प्रवासातील एक निर्णायक पर्व ठरले आहे. पायाभूत सुविधांच्या प्रत्येक क्षेत्रात, रेल्वे, रस्ते, विमान वाहतूक, सागरी आणि डिजिटल, अशा सर्वच क्षेत्रातील पायाभूत सुविधांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली. दुर्गम सीमावर्ती भागांपासून ते देशाच्या सर्वात मोठ्या शहरी केंद्रांपर्यंत, कनेक्टिव्हिटी वाढली. कनेक्टिव्हिटी वाढल्यामुळे भारत अधिक जवळ आला, अतंर कमी झाले. 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये सरकारचा पायाभूत सुविधांसाठीचा भांडवली गुंतवणुकीचा खर्च वाढून 11.21 लाख कोटी म्हणजेच अंदाजे 128.64 कोटी डॉलर्स इतका झाला आहे. जो सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या (जीडीपी) 3.1 टक्के इतका आहे. तर 2027 पर्यंत भारत दर 12 ते- 18 महिन्यांनी आपल्या जीडीपीमध्ये 1 ट्रिलियन डॉलर्सची भर घालेल असा अंदाज आहे. पायाभूत सुविधा हे आर्थिक वाढीचे गुणक बनले आहेत आणि 2025 हे असे वर्ष आहे, ज्या वर्षात या गुणकाचे दृश्यमान परिणाम दिसू लागले आहेत.

मिझोरामध्ये प्रथमच रेल्वे

मिझोराम अखेरीस भारताच्या राष्ट्रीय रेल्वे जाळ्यामध्ये समाविष्ट झाल्याने इतिहास घडला आहे, ज्यामुळे ईशान्य भारतासाठी एक परिवर्तनकारी टप्पा आणि राज्यातील लोकांची दीर्घकाळापासूनची मोठी आकांक्षा पूर्ण झाली आहे. या यशासह, मिझोराम भारताच्या रेल्वे नकाशावर आले आहे. 51 किलोमीटर लांबीची बैराबी-सैरांग रेल्वे मार्गिका, जी 8000 कोटींहून अधिक खर्चाने बांधली गेली आहे, तिने स्वतंत्र भारताच्या इतिहासात प्रथमच ऐझॉलला थेट भारताच्या राष्ट्रीय रेल्वे जाळ्याशी जोडले आहे. आपत्कालीन सेवा, लष्करी दळणवळण, नागरिकांसाठी आरोग्यसेवेची उपलब्धता, शिक्षण आणि रोजगाराच्या संधी, या सर्वांमध्ये मिझोरामच्या लोकांसाठी एकाच रेल्वे मार्गामुळे महत्त्वपूर्ण बदल झाले आहे. इतकेच नाही, तर 14 सप्टेंबर 2025 रोजी पहिली मालवाहतूक झाली, जेव्हा सिमेंटच्या 21 वॅगन पाठवण्यात आल्या होत्या. मिझोराम रेल्वे मार्गाला जोडल्या गेल्यामुळे आता आसाम ते ऐझॉलपर्यंत, बांबू, फलोत्पादन, विशेष पिके यासारख्या स्थानिक कृषी उत्पादनांना कमी खर्चापर्यंत भारताच्या मुख्य बाजारपेठेपर्यंत पोहोचला येणार आहे.

जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे उद्घाटन

उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्पांतर्गत जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाच्या चिनाब पुलाच्या उद्घाटनाने भारताचा अभियांत्रिकी आत्मविश्वास नवीन उंचीवर पोहोचला. या ऐतिहासिक कामगिरीने काश्मीर खोरे सर्व हवामान रेल्वे कनेक्टिव्हिटीद्वारे देशाच्या उर्वरित भागाशी जोडले, ज्यामुळे एक दीर्घकाळापासूनचे राष्ट्रीय उद्दिष्ट प्रत्यक्षात आले आहे. तामिळनाडूमध्ये भारताच्या पहिल्या उभ्या-लिफ्ट सागरी पुलाचं उद्घाटन करण्यात आलं आहे. 2025 मध्ये भारताची पायाभूत सुविधांची कहाणी समुद्रापर्यंतही पोहोचली आहे. पंतप्रधान मोदींनी तामिळनाडूमध्ये नवीन पांबन पुलाचे उद्घाटन केले. नवीन पांबन पूल हा भारताचा पहिला उभा लिफ्ट सागरी पूल आहे. हा एक असा पूल आहे, जो अमेरिकेतील गोल्डन गेट ब्रिज, लंडनमधील टॉवर ब्रिज आणि डेन्मार्क-स्वीडनमधील ओरेसुंड ब्रिज यांची बरोबरी करतो.

भारताच्या पहिल्या कंटेनर ट्रान्सशिपमेंट पोर्टचे उद्घाटन

पंतप्रधानांनी ८,९०० कोटी रुपयांच्याविझिंजम आंतरराष्ट्रीय खोल पाण्यातील बहुउद्देशीय सीपोर्ट’चे उद्घाटन केले आहे. हे देशातील पहिले समर्पित कंटेनर ट्रान्सशिपमेंट पोर्ट आहे, जे विकसित भारताच्या एकत्रित दृष्टिकोनाचा भाग म्हणून भारताच्या सागरी क्षेत्रात होत असलेल्या परिवर्तनात्मक प्रगतीचे प्रतिनिधित्व करते.

बिहारमध्ये पहिल्या वंदे मेट्रोचे उद्घाटन

बिहारमधील पहिली वंदे मेट्रो, ज्याला नमो भारत रॅपिड रेल म्हणूनही ओळखले जाते, जयनगरला पटनाशी जोडण्यासाठी सुरू करण्यात आली, ज्यामुळे प्रादेशिक कनेक्टिव्हिटी वाढली. या प्रकारची पहिली, पूर्णपणे वातानुकूलित आणि आरक्षण नसलेली ट्रेन केवळ साडेपाच तासांत पटना येथे पोहोचते.

झेड-मोरह बोगद्याचे उद्घाटन

२०२५ मध्ये, पंतप्रधानांनी जम्मू आणि काश्मीरमधील धोरणात्मक झेड-मोरह बोगद्याचे उद्घाटन केले, हा एक महत्त्वाचा पायाभूत सुविधा प्रकल्प आहे जो सोनमर्गला वर्षभर कनेक्टिव्हिटी प्रदान करतो आणि लडाख प्रदेशातील दळणवळण वाढवतो.

जम्मू ते श्रीनगर पर्यंत पहिल्यांदाच रेल्वेने थेट कनेक्टिव्हिटी

हाय-टेक वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचे उद्घाटन पंतप्रधान मोदींनी केले आहे, यामुळे जम्मू ते श्रीनगर पर्यंत पहिल्यांदाच रेल्वेने थेट कनेक्टिव्हिटी शक्य झाली आहे.

दिल्ली-मेरठ प्रादेशिक जलद वाहतूक प्रणाली (RRTS)

दिल्ली-मेरठ RRTS कॉरिडॉरचा शेवटचा भाग पूर्ण व्यावसायिक ऑपरेशन्ससाठी खुला झाला, ज्यामुळे दिल्लीच्या सराय काले खान ते मेरठमधील मोदीपुरम पर्यंत ८२.१५ किलोमीटरची जोडणी पूर्ण झाली.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनासह भारताच्या विमान वाहतुकीच्या क्षमतेनं मोठी झेप घेतली आहे. या टप्प्यामुळे मुंबईच्या विद्यमान विमानतळावरील दबाव कमी झाला आणि प्रवासी आणि मालवाहतूक वाढीच्या पुढील लाटेसाठी भारताची तयारी देखील बळकट झाली आहे.

नौदल पायाभूत सुविधांसाठी मोठे वर्ष

२०२५ हे नौदल पायाभूत सुविधांसाठी देखील एक महत्त्वाचे वर्ष होते. ऑगस्ट २०२५ मध्ये, भारताने ७५ टक्क्यांपेक्षा जास्त स्वदेशी सामग्रीसह आयएनएस हिमगिरी आणि आयएनएस उदयगिरी या दोन स्टील्थ फ्रिगेट्सचा समावेश केला ही मोठी उपलब्धी मानली जात आहे.