सिद्धेश्वर मंदिरात चेंगराचेंगरी, 7 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू; श्रावण सोमवारी मोठी दुर्घटना !
बिहारच्या जहानाबाद येथील सिद्धेश्वरनाथ मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीमुळे 7 भाविकांना जीव गमवावा लागला असून अनेक जण जखमी झाले आहेत. श्रावण सोमवारी शंकराला जलाभिषेक करताना ही दुर्घटना घडली.

श्रावणातील सोमवारी बिहारच्या जहानाबादमध्ये शंकराला जलाभिषेक करताना गोंधळ माजून चेंगराचेंगरी झाल्यामुळे मोठी दुर्घटना झाली. या दुर्दैवी घटनेमध्ये 7 भाविकांचा घटनास्थळी मृत्यू झाला असून मृतांमध्ये पाच महिलांचा समावेश आहे. तर यामध्ये 12 हून अधिक जण जखमी देखील झाले आहेत. यापैकी अनेक जखमी भाविकांची तब्येत गंभीर असल्याचे समजते.
नक्की काय झालं ?
जहानाबादच्या मखदुमपुर येथील वाणावर बाबा सिद्धेश्वरनाथ मंदिरात ही दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेसंदर्भात माहिती मिळताच पोलिस आणि आपत्ती निवारण पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. तर जखमी भाविकांवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
माहितीनुसार, श्रावणी सोमवार असल्याने हे सर्व भाविक भोलेनाथाच्या जलाभिषेकासाठी मंदिरात जमले होते. मंदिरात दर्शनासाठी भाविकांची लांबच लांब रांग लागली होती. सकाळी अचानाक धक्का–बुक्की झाल्याने रांग मोडली आणि चेंगराचेंगरी झाली. त्यामुळे एकच खळबळ माजली, भक्तांची धावपळ सुरू झाली आणि भाविकांनी जीव गमावला. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
Bihar | “At least seven people died and nine injured in a stampede at Baba Siddhnath Temple in Makhdumpur of Jehanabad district. We are monitoring everything and now the situation is under control, ” says Jehanabad DM Alankrita Pandey to ANI
— ANI (@ANI) August 12, 2024
जलाभिषेकादरम्यान झाली धक्काबुक्की
अपघातात जखमी झालेले आनंद कुमार उर्फ विशाल यांनी सांगितले की, ही घटना रात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली. त्यावेळी मंदिरात जल अर्पण करणाऱ्यांची मोठी गर्दी झाली होती. आधी जल अर्पण करण्यासाठी भाविकांची लगबग सुरू झाली. काही वेळातच या हाणामारीचे चेंगराचेंगरीत रूपांतर झाले. अशा परिस्थितीत जे बाहेर गेले ते वाचले, पण जे आत अडकले होते, त्यांच्यावर किती जण चढले आणि ते बचावले, हे सांगू शकत नाही. पण त्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली.
