
अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातामुळे संपूर्ण देश हादरला आहे. या अपघाताचे अनेक व्हिडिओ आणि फोटो समोर येत आहेत, यातून या अपघाताची भीषणता समोर येते. अहमदाबादवरुन लंडनला जाणारे विमान बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहात कोसळले. ज्यामध्ये विमानात असलेल्या २४१ जणांचा मृत्यू झाला तर काही विद्यार्थ्यांनाही या अपघातात जीव गमवावा लागला आहे. या अपघातानंतर विमानातील प्रवाशांच्या वस्तू गोळा करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये रोख रक्कम, सोने-चांदीचे दागिने आणि इतर वस्तू सापडल्या आहेत.
बचाव पथकाला ढिगाऱ्यात ‘या’ वस्तू सापडल्या
अपघात झाल्यापासून बचाव पथक घटनास्थळी मदतकार्य करत आहे, बहुतेक प्रवाशांचे मृतदेह येथून काढण्यात आले आहेत. यावेळी बचाव पथकाला घटनास्थळावरून एका प्रवाशाचा मोबाईल फोन देखील सापडला आहे ज्याची स्क्रीन तुटलेली होती, परंतु हा फोन वाजत होता. तसेच घटनास्थळावरून काही दागिने, रोख रक्कम आणि महत्त्वाची कागदपत्रे देखील सापडली आहेत.
८० ते ९० तोळे सोने सापडले
अहमदाबाद विमान अफघातानंतर बचाव करणाऱ्या बचाव पथकाच्या एका सदस्याने सांगितले की, ‘ब्रिटिश पासपोर्टसह, या ढिगाऱ्यात ८ ते १० वेगवेगळ्या प्रवाशांचे पासपोर्ट सापडले आहेत. त्यासोबतच ८० ते ९० तोळे सोन्याचे दागिने सापडले आहेत. तसेच घटनास्थळावरून ८० ते ९० हजार रुपयांची रोख रक्कमही सापडली आहे. या सर्व वस्तू सरकारी कार्यालयात जमा करण्यात आल्या आहेत.
अहमदाबादमधील या भीषण विमान अपघाताच्या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या बहुतेक प्रवाशांचे मृतदेह जळाले आहेत, ज्यामुळे कुटुंबियांना त्यांच्या नातेवाईकांची ओळख पटवणे कठीण झाले आहे. त्यामुळे आता डीएनए चाचणीद्वारे मृतांची ओळख पटवली जाणार आहे. दरम्यान, घटनास्थळी कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी आपण कधीही असे भयानक दृश्य पाहिले नव्हते असे विधान केले आहे.
विमान अपघातात बचावलेल्या व्यक्तीने काय सांगितलं?
अहमदाबाद विमान अपघातातातून एक प्रवाशी जिवंत बचावला आहे. रमेश विश्वकुमार असे या व्यक्तीचे नाव आहे. त्याने सांगितले की, ‘टेकऑफ झाल्यानंतर १ मिनिटाच्या आत ही घटना घडली. टेकऑफ झाल्यानंतर ५ ते १० सेकंदासाठी विमान अडकल्यासारखे वाटले. यानंतर मला वाटलं काही तरी गडबड आहे. यानंतर काही सेकंदात हिरवी आणि पांढऱ्या रंगाची लाईट ऑन झाली. यानंतर ज्याप्रमाणे आपण गाडीला रेस देतो तशाच प्रकारे विमानाचा स्पीड वाढला आणि ते विमान डायरेक्ट हॉस्टेलला धडकले, अशाप्रकारे हे सर्व घडलं.’