मी टिकली घेऊन लगेच येते; लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नवरी गायब, नेमकं काय घडलं?
एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. लग्नाच्या तिसऱ्या दिवशी नवऱ्यासोबत बाजारात खरेदीसाठी गेलेली नवरी अचानक गायब झाली. ती शेजारच्या दुकातान केवळ टिकली घेण्यासाठी गेली होती. मात्र, त्यानंतर परत आलीच नाही.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तिसगाव परिसरात एक धक्कादायक फसवणूक उघडकीस आली आहे. शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने विश्वास संपादन करून लग्नाचे आमिष दाखवले आणि लग्नानंतर अवघ्या तिसऱ्या दिवशी नववधू बाजारात खरेदीच्या बहाण्याने निघून गेली. “मी टिकली घेऊन लगेच येते,” असे सांगून तिने स्त्रीधन म्हणून घेतलेले दीड लाख रुपये तसेच सोन्या-चांदीचे दागिने घेऊन पलायन केले. या प्रकरणात नवरी, तिची आई आणि दोन मध्यस्थांनी नवरदेवाकडील मंडळींचा विश्वासघात केल्याचा आरोप आहे. घटना १७ ऑगस्ट रोजी घडली असून एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सहा जणांविरोधात तक्रार दाखल
तक्रारदार संदीप सुभाष रगडे (वय ३३, रा. रमाबाई आंबेडकरनगर, तिसगाव) यांनी सहा जणांविरोधात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, रगडे यांचे शेजारी बाबासाहेब देवरे यांच्याशी ओळख होती. या ओळखीचा गैरफायदा घेत देवरे यांनी स्वाती देवरे या तरुणीसोबत रगडे यांचा विवाह लावून देण्याचे ठरवले. ११ ऑगस्ट रोजी विवाह ठरला होता, पण तो न झाल्याने १२ ऑगस्ट रोजी रगडे यांच्या तिसगाव येथील घरी विवाह संपन्न झाला. विवाहासाठी संबंधितांनी खर्चाच्या नावाखाली रगडे यांच्याकडून १ लाख ५० हजार रुपये, सुमारे तीन ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, चांदीचे जोडवे आणि इतर दागिने घेतल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं?
लग्नानंतर तिसऱ्या दिवशी स्वाती हिच्यासोबत संदीप रगडे हे बजाजनगरात खरेदीसाठी गेले होते. मोहटादेवी मंदिराजवळील एका दुकानातून कपडे व इतर साहित्य खरेदी केल्यानंतर टिकली घेण्यासाठी जाते, असे सांगून नवविवाहिता दुकानाबाहेर गेली. बराच वेळ झाल्यावर त्यांनी शोध घेतला, पण ती सापडली नाही. तेव्हापासून ती परत आलेली नाही, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याचा दावा रगडे यांनी केला आहे. या प्रकरणात बाबासाहेब देवरे, अमोल म्हस्के, नितीन दाभाडे, स्वाती रमेश देवरे, रमेश ज्ञानोबा देवरे आणि मीराबाई रमेश देवरे यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
यापूर्वीही घडली होती अशी घटना
नऊ महिन्यांपूर्वी ३० नोव्हेंबर रोजी कर्जत (जि. अहिल्यानगर) येथील एका युवकाला याच पद्धतीने बजाजनगरात जाळ्यात ओढण्यात आले होते. तेथे छत्रपती संभाजीनगर कोर्टात १०० रुपयांच्या स्टॅम्पवर नोटरी करून तीन लाख रुपये (१.४५ लाख फोन पे + १.५५ लाख रोख) उकळले गेले होते. त्यानंतर चारचाकीतून गावी जात असताना पांढऱ्या कारमधून आलेल्या साथीदारांनी गाडी अडवून नववधूला पळवून नेले होते. त्यामुळे वाळूज परिसरात अशा प्रकारची ही पहिलीच घटना नाही हे स्पष्ट होत आहे.