
आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नुकतेच मद्य परवाना धोरण घोटाळ्यातून सुटले. न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी त्यांची निर्दोष मुक्तता केली. निकालानंतर अरविंद केजरीवाल यांना अश्रू अनावर झाले होते. निकाल लागताच अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली होती. अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा राजकारणात सक्रीय होण्याचे संकेत दिले आहेत. आता पुढे पंजाबच्या निवडणुका आहेत. अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाची दिल्लीवर दहावर्षापेक्षा जास्त काळ सत्ता होती. पण 2025 मध्ये भाजपने त्यांचा पराभव करुन दिल्लीची सत्ता मिळवली.
आता अरविंद केजरीवाल पुन्हा राजकारणात सक्रीय होतील असं दिसतय. आता अरविंद केजरीवाल यांनी एक्सवर एक पोस्ट करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. “भारताला रशियाकडून तेल खरेदीची परवानगी देणारा अमेरिका कोण होतो? भारताला अमेरिकेकडून परवानगी घेण्याची काय गरज आहे?” असे प्रश्न अरविंद केजरीवाल यांनी विचारले आहेत.
मोदी जी अशी तुमची काय मजबुरी आहे की…
“मागच्या काही महिन्यात प्रत्येक पावलावर तुम्ही ट्रम्प समोर झुकलात. त्यांच्यासमोर बोलण्याची तुमची हिम्मत झाली नाही. हे सर्व पाहताना देशवासियांना वेदना झाल्यात. मोदी जी अशी तुमची काय मजबुरी आहे की, त्यामुळे तुम्ही ट्रम्पसमोर नतमस्तक होता” अशी टीका केजरीवाल यांनी केली आहे.
भारत को रशिया से तेल ख़रीदने की इज़ाज़त देने वाला अमेरिका कौन होता है? भारत को अमेरिका से इज़ाज़त की क्यो ज़रूरत है?
पिछले कुछ महीनों में देशवासियों ने बहुत पीड़ा के साथ देखा है कि किस तरह एक के बाद एक, हर कदम पर आप ट्रम्प के सामने झुक गए और आपकी उसके सामने बोलने तक की हिम्मत… https://t.co/5Hk2ZOB5f3
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) March 6, 2026
सर्व देशवासियांना खूप वेदना होतात
“भारताला हजारो वर्षांचा इतिहास आहे. भारत 140 कोटी लोकसंख्येचा महान देश आहे. भारतात एकापेक्षा एक वीर योद्धांचा जन्म झाला आहे. भारताने आजपर्यंत कुठल्याही देशासमोर अशा पद्धतीने मान झुकवलेली नाही. आजपर्यंत भारतीय इतिहासात कधीही भारताचं नेतृत्व इतकं कमजोर नव्हतं. खरच तुमच्या अशा कुठल्या मजबुरीचा ट्रम्प फायदा उचलत असतील तर भारत आणि भारतीयांच्या हितासाठी कृपया राजीनामा द्या. भारत मातेला झुकवू नका. सर्व देशवासियांना खूप वेदना होतात” असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.