Abhijeet Dipke : अभिजीत दिपकेंचं नवं टार्गेट ठरलं, धर्मेंद्र प्रधान, सरकारी शाळेनंतर आता…CJP ची नवी मोहीम काय?
अभिजीत दिपकेचं नवं टार्गेट ठरल्याची चर्चा आहे. धर्मेंद्र प्रधान, सरकारी शाळेनंतर आता सीजेपी नवीन मोहीम हाती घेणार असल्याची चर्चा आहे.

कॉक्रोच जनता पार्टीने जंतर-मंतरवर महिनाभर आंदोलन केलं होतं. अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनामुळे धर्मेंद्र प्रधान यांना केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीने ‘स्कूल ठीक करो’ अभियान हाती घेतलं. गेल्या काही दिवसांपासून राबवत असलेल्या या अभियानासाठी दीपकेंनी महाराष्ट्रातील अनेक जिल्हे पिंजून काढले. या अभियानानंतर आता दीपके यांनी नवीन अभियान हाती घेणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. कथित इन्फ्लुएन्सर स्वतंत्र भारद्वाजवर भाष्य करताना दीपकेंनी पोलीस विभागाच्या कारभारावर निशाणा साधल्याने नव्या मोहीमेची चर्चा सुरू झाली आहे.
एका विद्यार्थिनीच्या वडिलांवर हल्ला करणाऱ्या स्वतंत्र भारद्वाजच्या विरोधात कॉक्रोच जनता पार्टीने दिल्ली पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी भारद्वाजच्या मुसक्या आवळल्या. तसेच त्याच्या विरोधात अॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत देखील गुन्हा दाखल केला आहे. याच मुद्द्यावरून अभिजीत दीपके यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटलं की, दिल्ली पोलिसांनी संघी गुंडाच्या विरोधात एफआयआर नोंदवला आहे. पोलसांना केवळ एफआयआर नोंदवण्यासाठी दोन महिने लागले. त्याच्यासाठी एक आंदोलन देखील झालं. खरंतर आता पोलीस खात्यात देखील सुधारणा हवी’.
Finally, Delhi Police have registered an FIR against the Sanghi goon and said he will be arrested within 72 hours.
It took two months and a protest just to get an FIR registered for a hate crime that happened right in front of the police.
POLICE DEPARTMENT THIK KARO!
— Abhijeet Dipke (@abhijeet_dipke) September 4, 2026
भारद्वाजला उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरातून ताब्यात घेतलं. परंतु दीपके यांनी पोलीस खात्यात सुधारणा व्हावी, असं भाष्य केल्याने त्यांच्या नव्या मोहीमेची चर्चा होऊ लागली आहे. आता कॉक्रोच जनता पार्टी पोलीस विभागात सुधारणा घडवून आणण्यासाठी मोहीम हाती घेणार का, याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. तत्पूर्वी, दोन दिवसांपूर्वी दीपकेंनी नाशिकमधील आदिवासी विद्यार्थी आंदोलकांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी आदिवासी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधा, भोजन, शिक्षणातील असमानता ही स्वीकारण्याजोगी नसल्याचे म्हटलं. महाराष्ट्रातील विविध भागातील 100 आदिवासी विद्यार्थी आंदोलन करत आहेत. यातील तीन विद्यार्थ्यांनी आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. विद्यार्थ्यांच्या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना आदिवासी विद्यार्थ्यांना न मिळणाऱ्या आरोग्य सुविधा, हॉस्टेलमधील खराब शौचालय, शैक्षणिक सुविधेवर लक्ष वेधले. आदिवासी आश्रमातील परिस्थिती जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दौरे केले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.