अभिजीत दिपकेंची CJP या पक्षाच्या पाठिंब्यावर निवडणुकीच्या मैदानात उतरणार? थेट पक्षाध्यक्षांसोबत महत्त्वाची बैठक, घडामोडींना वेग
अभिजीत दिपके संस्थापक असलेली सीजेपी (CJP) ची एक महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीनंतर आता असा प्रश्न उपस्थित केला जात आहे की, सीजेपी राजकारणात उतरू शकते. मोठी बातमी समोर येत आहे.

नीट परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर राज्यभरात संतापाचं वातावरण होतं. सरकारविरोधात एक प्रकारचा असंतोष होता. दरम्यान त्यानंतर या आंदोलनात अभिजीत दिपके संस्थापक असलेल्या कॉकरोच जनता पार्टीने (CJP) ने उडी घेतली. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने करण्यात आली. त्यासाठी तब्बल 35 दिवस दिल्लीमधील जंतरमंतरवर आंदोलन सुरू होतं. कॉकरोच जनता पार्टीने संसदेवर देखील मोर्चा काढला. यावेळी या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचं पहायला मिळालं. पोलीसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला, या घटनेत अनेक आंदोलक जखमी झाले होते. तर दुसरीकडे काही ठिकाणी पोलिसांवर देखील दगडफेक करण्यात आली. दरम्यान त्यानंतर अखेर दबाव वाढल्यामुळे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपला राजीनामा दिला. सीजेपीच्या आंदोलनाला मोठं यश मिळालं.
त्यानंतर आता सातत्याने सीजेपी राजकारणात उतरणार का? निवडणूक लढवणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. या संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीला आता अवघे काही महिने शिल्लक आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. नुकतीच समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि सेजीपीचे नेता आशुतोष रांका यांच्यामध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडली आहे. उत्तर प्रदेशमध्ये होत असलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने या बैठकीला महत्त्व प्राप्त झालं आहे.
दरम्यान सीजेपीचे नेते सौरभ दास आणि रत्ना सिंहं हे एका कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला की जर तुम्हाला अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांनी पाठिंबा दिला तर तुम्ही निवडणूक लढवणार का? यावर बोलताना रत्ना सिंह यांनी म्हटलं आहे की, भविष्यात काय गोष्टी घडणार आहेत हे मला माहिती नाही, कारण मी वर्तमानात जगणारी आहे. मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक निर्णय त्याच दिवशी घेते. मी पुढे चालून निवडणूक लढवेन की नाही, सीजेपीसोबत असेल की नाही हे मी आता सांगू शकत नाही. माझ्या मनात जे आलं, मला जे करावं वाटतं ते मी करते असं यावेळी रत्ना सिंह यांनी म्हटलं आहे.
दरम्यान दुसरीकडे आशुतोष रांका यांनी लखनऊमध्ये सपा प्रमुख अखिलेश यादव यांची घेतली या भेटीबाबत स्पष्टीकरण देताना सपाचे प्रवक्ता फखरुल हसन चांद यांनी म्हटलं की सीजेपीचे प्रवक्त आशुतोष रांका यांनी अखिलेश यादव यांची भेट घेतली, मात्र या भेटीमागे केवळ त्यांचे आभार व्यक्त करणं एवढाच हेतू होता.
