Abhijeet Dipke CJP : ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी सोडून दिली का? अखेर अभिजीत दीपकेच्या कॉकरोच जनता पार्टीने मौन सोडलं
Abhijeet Dipke CJP : "आम्ही स्कूल ठीक करो अभियान पुन्हा एकदा सुरु केलय. आम्ही संघटनात्मक बांधणीवर लक्ष देतोय. आयुष्यभर तुम्ही आंदोलनाच्या मोड मध्ये राहू शकत नाही. तुम्हाला हे सुरु ठेवायचं असेल तर संघटनेची आवश्यकता लागणार"

दिवाळीच्या आधी देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात कॉकरोच जनता पार्टीकडून आक्रमक आंदोलनं करण्यात आली. ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी सीजेपीची भूमिका होती. पण मागच्या काही दिवसांपासून सीजेपी एकदम शांत झाल्याचं दिसत आहे. दिवाळी काळात शांत राहणार असल्याचं अभिजीत दीपेक यांनी सांगितलं होतं. आता दीवाळी संपली आहे, तरीही सीजेपी शांतच दिसत आहे. ज्ञानेश कुमारांच्या मुद्यावर ते काहीच बोलत नाहीयत. कॉकरोच जनता पार्टीचे तीन स्तंभ अभिजीत दीपके, सौरभ दास आणि आशुतोष रांका हे सोशल मीडियावर ज्ञानेश कुमार यांचं नावही घेत नाहीयत. ते पुन्हा एकदा स्कूल ठीक करो अभियानात गुंतले आहेत. त्यामुळे सीजेपीचं ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील आंदोलन संपलं का? असा प्रश्न निर्माण होणं स्वाभाविक आहे.
सीजेपीला आता CEC चा राजीनामा नको का? सीजेपीचे सहसंस्थापक आशुतोष रांका यांनी उपस्थित होणाऱ्या या प्रश्नांवर उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. पुढच्यावेळी रस्त्यावर उतरुन कधी आंदोलन करणार यावर त्यांनी काहीही स्पष्ट उत्तर दिलं नाही. “देशात थंडी आलीय पण आम्ही थंड पडणार नाही. काल परवा मी हरियाणा दौऱ्यावर होतो, सौरभ दिल्ली दौऱ्यावर होता, काल त्याने यूपीच्या शाळांचा दौरा केला. दीपके कोचीच्या दौऱ्यावरुन आलाय. आम्ही जमिनीवरच आहोत. एकाचवेळी दोन-तीन गोष्टींवर आमचं लक्ष आहे. एकतर आमच्याकडे SIR चा मुद्दा आहे. त्यावर आमचं लक्ष आहे. आम्ही जिथे जातोय, तिथे जाऊन लोकांचा मताधिकार कसा हिरावला गेला त्यांच्याकडून हे समजून घेतोय” असं आशुतोष रांका म्हणाले. त्यांनी वरिष्ठ पत्रकार अजीत अंजुमच्या यूट्यूब चॅनलला मुलाखत दिली. “काही दिवसांपूर्वी दिवाळी साजरी केली. बऱ्याच काळानंतर कुटुंबासोबत वेळ घालवला. आता पुन्हा जमिनीवर उतरलोय” असं सीजेपीचे सहसंयोजक आशुतोष रांका यांनी सांगितलं.
मग प्रश्न फक्त सीजेपीलाच का?
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आता आवश्यकता नाहीय का? सर्वकाही चांगलं चाललय का? त्यावर रांका म्हणाला की, “त्या लॉजिकने तर सगळा देशच थंड पडलाय. मग थंड पडण्याचा प्रश्न फक्त सीजेपीला का विचारला जातोय?. सीजेपी रस्त्यावर आंदोलन करत होती. सीजेपी सतत आंदोलनात उतरली आहे, आम्हाला ताब्यात घेतलं, अटक झाली, कोच्चीमध्ये दिवाळीच्या एक दिवस आधी सभा झाली. त्यानंतर हरियाणा, दिल्ली, यूपी, पाटणा आम्ही बऱ्याच ठिकाणी जाणार आहोत” “आम्ही आपल्या स्तरावर काम करतोय. मध्ये 15 दिवसांचा ब्रेक घेतला, त्यावर प्रश्न विचारले जातायत की सीजेपीमध्ये सन्नाटा का आहे? 15 दिवसांपासून इतर सर्वही शांतच आहेत. आम्ही कोणाशी तुलना किंवा स्पर्धा करत नाहीय. मी म्हणतोय की, 15 दिवसांचा ब्रेक सर्वच पक्ष, संघटनांनी घेतला. मग प्रश्न फक्त सीजेपीलाच का?” असा सवाल आशुतोष रांका यांनी विचारला.