Abhijit Dipke : अभिजीत दीपकेंचा मोठ्या बैठकीपूर्वीच सरकारला थेट इशारा, म्हणाला, पुन्हा अशी चूक…

कॉकरोच जनता पार्टीचे नेते अभिजीत दीपके यांनी सरकारला गंभीर इशारा दिला आहे. नोएडामध्ये आंदोलक कर्मचाऱ्यांविरोधात कायद्याचा गैरवापर करून कारवाई केल्याचा संदर्भ देत, दीपके म्हणाले की, विद्यार्थ्यांविरोधातही असेच घडल्यास सहन केले जाणार नाही. हक्कांसाठी लढणाऱ्यांवर दडपशाही थांबवावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असे ते म्हणाले.

Abhijit Dipke : अभिजीत दीपकेंचा मोठ्या बैठकीपूर्वीच सरकारला थेट इशारा, म्हणाला, पुन्हा अशी चूक...
Abhijit Dipke
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 24, 2026 | 4:34 PM

नोएडामध्ये आंदोलन करणाऱ्या खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईचा हवाला देऊन कॉकरोच जनता पार्टीचे नेते अभिजीत दीपके यांनी सरकारवर गंभीर निशाणा साधला आहे. जे लोक आपल्या हक्कासाठी लढत आहेत. त्यांच्याविरोधात कायद्याचा वापर करणं सरकारनं बंद करावं. नोएडातील कर्मचाऱ्यांच्याबाबत जे घडलं तेच आता विद्यार्थ्यांबाबत करण्याचा प्रयत्न होत आहे. जर हे असंच सुरू राहिलं तर सहन केलं जाणार नाही, असा इशाराच अभिजीत दीपके यांनी दिला आहे.

अभिजीत दीपकेंनी मीडियाशी संवाद साधताना हा इशारा दिला आहे. आपल्या अधिकारासाठी लढणाऱ्या लोकांच्या विरोधात कायद्याचा चुकीचा वापर केला जात आहे, असं दीपके म्हणाले. तसेच त्यांनी इंडियन एक्सप्रेसची बातमीही ट्विट केली आहे. या वर्षी एप्रिलमध्ये आठवडाभर खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू होतं. पोलिसांनी या 200 कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलं होतं. या कर्मचाऱ्यांना जामीन मिळाला. पण पोलिसांनी तोपर्यंत सरासरी 53 दिवस या कर्मचाऱ्यांना तुरुंगात डांबल्याचं या बातमीत म्हटलेलं आहे.

कोर्टाने फटकारलं

इंडियन एक्सप्रेसची बातमी रिपोस्ट करताना दीपकेंनी थेट सरकारला सवाल केला आहे. माझ्या पाकिस्तान कनेक्शनचं काय झालं?, असा सवाल त्यांनी केला आहे. या चौकशीत आंदोलन केल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने मजदुरी वाढवली आहे. पण मजदुरांना तुरुंगात राहावं लागलं. कोर्टाने यापैकी अनेकांना जामिनावर सोडलं आहे. पोलिसांनी कोणताही ठोस पुरावा दिला नाही. केवळ आंदोलन केलं म्हणून या मजदुरांना अटक केली होती, असं कोर्टाने म्हटलंय. दरम्यान, पकडण्यात आलेल्या दोन मजदुरांना एनएसएखाली अटक करण्यात आली आहे. या कायद्यामुळे दीर्घकाळ त्यांना तुरुंगात डांबलं जाऊ शकतं.

आता सहन करणार नाही?

सरकारने आपल्या हक्कांसाठी लढणाऱ्या लोकांच्या विरोधात कायद्याचा चुकीचा वापर करणं तात्काळ थांबवलं पाहिजे. नोएडाच्या कामगारांसोबत जे केलं ते आता विद्यार्थ्यांसोबत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पुन्हा अशी चूक केली तर सहन केलं जाणार नाही, असा इशाराच दीपके यांनी दिली आहे.

दरम्यान, सोमवारी सीजेपीच्या राष्ट्रीय कार्यसमितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत 25 जुलै रोजी देशव्यापी आंदोलन मागे घेतल्यानंतर सरकारकडून करण्यात आलेल्या आश्वासनांची देशव्यापी समीक्षा करण्यात येणार आहे. सरकारने आतापर्यंत आम्हाला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही. तसेच आम्हाला त्याबाबतची कोणतीही औपचारिक माहिती दिलेली नाही, असंही त्यांनी म्हटलंय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us