
मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. बागेश्वर धाममध्ये झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून 12 जण जखमी झाले आहेत. मंगळवारी पहाटे गढ़ा गावातील धर्मशाळेत झोपलेल्या भाविकांवर धर्मशाळेची भिंत कोसळली. या अपघातात उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यातील रहिवासी 40 वर्षीय अनिता देवी या ढिगाऱ्याखाली गाडल्या गेल्या, यात त्यांचा मृत्यू झाला. सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, अनिता देवी या सोमवारी सायंकाळी बागेश्वर धाम येथे पोहोचल्या होत्या. त्यानंतर त्यांनी रात्री 10 वाजता पीठाधीश धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्याकडून दीक्षा घेतली. यानंतर त्यानंतर अनिता या मुलगी अंशिका आणि कुटुंबातील इतर सदस्यांसह धर्मशाळेत मुक्कामासाठी गेल्या. मात्र पहाटे 4 वाजता सर्वजण गाढ झोपलेले असताना धर्मशोळेची भिंत कोसळली, त्यामुळे अनिता देवी यांच्यासह संपूर्ण कुटुंब ढिगाऱ्याखाली गाडले गेले. आसपासच्या लोकांनी या ढिगाऱ्यातून लोकांना बाहेर काढले, मात्र श्वास कोंडल्याने अनिता देवी यांचा मृत्यू झाला.
अनिता देवी यांच्या नातेवाईकांनी सांगितले की, धर्मशाळेत राहण्यासाठी लोकांना 100 रुपयांत बेड देण्यात आले होते. रात्री सर्व गोष्टी ठीक होत्या, मात्र पहाटे लोक झोपेतून उठण्यापूर्वी हा अपघात झाला. या अपघातानंतर अनिताची मुलगी अंशिका होती. आपली आई आता या जगात नाही यावर तिचा विश्वास बसत नाही.
जखमींवर उपचार सुरु
या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून 12 पैकी 4 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. गंभीर जखमींना चांगल्या उपचारांसाठी इतर रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
दरम्यान, बागेश्वर धाममध्ये आठवडाभरातील हा दुसरा मोठा अपघात आहे. काही दिवसांपूर्वी मंडप कोसळून एका भाविकाचा मृत्यू झाला होता, तर 10 जण जखमी झाले होते. बागेश्वर धाममध्ये सतत घडणाऱ्या या घटनांमुळे भाविकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.