
भारत हा फार मोठा देश आहे. येथे विविध धर्माचे, पंथांचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. येथील भाषा, पेहराव, खाद्यसंस्कृती पण वेगवेगळी आहे. पण विविधतेत एकता हे भारताचं ब्रीदवाक्य आहे. पण देशात अशी काही ठिकाणं आहेत. जिथे जगातील काही संस्कृती वसल्याचे दिसते. असेच एक गाव सध्या चर्चेत आहे. हे गाव गुजरात राज्यात आहे. या गावाचे नाव जंबूर असे आहे. या गावात पोहचल्यावर तुम्हाला आफ्रिकेत आल्यासारखंच वाटेल. या गावात आफ्रिकन लोकांची संख्या अधिक आहे. पण गेल्या कित्येक वर्षांपासून ते इथेच राहत असल्याने भारतीय संस्कृती आता त्यांच्या अंगवळणी पडली आहे.
जंबूर गाव गुजरातमधील अहमदाबाद जिल्ह्यात आहे. हे गाव जवळपास 20-25 वर्षांपूर्वी चर्चेत आले होते. जेव्हा येथील लोकसंख्येत आफ्रिकन नागरिकांची संख्या जास्त होती. येथील अधिकाधिक लोक हे नायजेरिया, घाना, केनिया आणि इतर आफ्रिकन देशातून आलेले आहेत. हे लोक व्यापार, शिक्षण वा नोकरीच्या निमित्ताने भारतात आले आणि या गावातच स्थायिक झाले. आज या गावातील 70-80 लोक हे आफ्रिकन आहेत.
अत्यंत अनोखे गाव
या गावात स्थानिक गुजराती समाज तर आहेच. पण ते या गावात अल्पसंख्यांक आहेत. या गावात फिरताना तुम्हाला आफ्रिकन शरीरयष्टीचे नागरिक, लहान मुलं, मुली आणि स्त्रीया सहज नजरेस पडतील. येथील लोक आफ्रिकन पेहराव तसेच भारतीय पेहराव सुद्धा करतात. पण त्यांची भाषा मात्र हिंदी आहे. ही हिंदी पण अगदी चपखल आहे. त्यामुळे त्यांची हिंदी भाषा ऐकून तुम्ही सुद्धा चाट पडाल. या लोकांना आता भारतीय जीवनशैली अंगवळणी पडली आहे. त्यामुळे सकाळी उठल्यावर त्यांच्याकडेही गरमा गरम वाफाळलेला चहा पाहुण्यांना मिळतो. या ठिकाणी हॉटेलपासून पान टपरी सुद्धा आहे. तिथे ही मंडळी गप्पा मारताना सहज दिसून येतात.
कमाईचे साधन काय?
आता हे आफ्रिकन लोक कमाईसाठी काय करतात असा सवाल अनेकांना पडतो. तर हे लोक लहान-सहान व्यापार करतात. ते कपडे, इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल तसेच इतर साहित्याचा व्यापार करतात. काही लोक डायमंड पॉलिशिंग इंडस्ट्रीत काम करतात. महिला गृहिणी आहेत अथवा घरगुती छोटी-मोठी कामं करतात. मुलं शाळेत जातात. यांच्या मुलांना गुजराती, हिंदी आणि इंग्रजी पण येते. या लोकांचे आफ्रिकन नृत्य पाहण्यासाठी दूर दूरून लोक येतात. या गावाची देशभरात मोठी चर्चा आहे.