Ahmedabad Plane Crash : 100 हून अधिक लोकांचा मृत्यूची शक्यता, प्रवाशांची संपूर्ण यादी समोर

अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला आहे. लंडनला जाणारे विमान टेकऑफनंतर कोसळले. १०० पेक्षा जास्त मृत्यूची भीती आहे. प्रवाशांची यादी समोर आली आहे ज्यामध्ये भारतीयांसह इतर देशांचे नागरिक होते. अहमदाबाद विमानतळ तात्पुरते बंद आहे

Ahmedabad Plane Crash : 100 हून अधिक लोकांचा मृत्यूची शक्यता, प्रवाशांची संपूर्ण यादी समोर
Ahmedabad Air India Plane 45
| Updated on: Jun 12, 2025 | 6:42 PM

अहमदाबादमध्ये आज एक भीषण विमान अपघात झाला आहे. अहमदाबादवरुन लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान टेकऑफनंतर अवघ्या दोन मिनिटांत कोसळले. या घटनेमुळे संपूर्ण शहरात भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या अपघातात १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. आता नुकतंच या विमानात प्रवास करणाऱ्या संपूर्ण प्रवाशांची यादी समोर आली आहे.

कोणत्या देशाचे किती प्रवाशी?

मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडियाचे फ्लाइट क्रमांक AI171 या विमानाने 12 जून रोजी दुपारी 1 वाजून 39 मिनिटांनी अहमदाबादहून लंडनला जाण्यासाठी उड्डाण घेतले. या विमानात एकूण २४२ प्रवासी होते. यात 2 पायलट आणि 10 केबिन क्रूचाही समावेश होता. त्यापैकी १६९ भारतीय नागरिक, ५३ ब्रिटिश नागरिक, १ कॅनेडियन नागरिक आणि ७ पोर्तुगीज नागरिक होते अशी माहिती एअर इंडियाने दिली आहे. तसेच प्रवाशांमध्ये ११ लहान मुलं आणि २ नवजात बालकांचाही समावेश होता अशी माहितीही समोर आली आहे.

पाहा प्रवाशांची संपूर्ण यादी 

या दुर्घटनेनंतर अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. यानंतर सुरक्षेसाठी हा अपघातग्रस्त परिसर पूर्णपणे सील करण्यात आला असून, आजूबाजूचे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. त्यासोबतच विमानात असलेल्या प्रवाशांची संपूर्ण यादी आणि त्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी हे देखील या अपघातग्रस्त विमानात असल्याची चर्चा आहे. त्यांच्या विमानाचे तिकीट आणि प्रवाशांच्या यादीत त्यांचे नावही पाहायला मिळत आहे.

अहमदाबाद विमानतळ बंद

या घटनेनंतर घटनास्थळावरील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामुळे लोकांमध्ये भीती आणि दुःखाचे वातावरण पसरले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्याच्या डीजीपींशी संपर्क साधून माहिती घेतली आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनीही तात्काळ पावले उचलली आहेत. एनएसजी (NSG) टीमनेही बचाव कार्यात सहभाग घेतला आहे. या अपघातानंतर अहमदाबाद विमानतळाची धावपट्टी पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. इतर सर्व विमानांची उड्डाणे दुसऱ्या विमानतळांवर वळवण्यात आली आहेत.

या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गुजरातमध्ये मोठी चिंता आणि दुःख व्यक्त केले जात आहे. या अपघातामुळे राज्यात शोककळा पसरली असून सर्वांच्या नजरा बचावकार्यावर आणि अधिकृत माहितीवर लागल्या आहेत.