अहमदाबाद विमान अपघातात चमत्कार! एकमेव प्रवासी सुदैवाने वाचला, चालत आला बाहेर अन्…

अहमदाबादमधील मेघानगरमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला. रमेश विश्वकुमार नावाचा एक प्रवासी या अपघातातून जिवंत बचावला. त्याने अपघातातील आपला अनुभव सांगितला आहे. विमानात एकूण २४२ प्रवासी होते.

अहमदाबाद विमान अपघातात चमत्कार! एकमेव प्रवासी सुदैवाने वाचला, चालत आला बाहेर अन्...
Ahmedabad Air India Plane 52
| Updated on: Jun 13, 2025 | 10:35 AM

अहमदाबादमधील मेघानीनगर भागात विमानाचा भीषण अपघात घडला. अहमदाबादवरुन लंडनसाठी निघालेले एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळले. या विमानाने टेकऑफ घेताच काही क्षणात ते मेघानीनगर या ठिकाणी कोसळलं. यामुळे विमानाला आग लागली. या घटनेचे अनेक व्हिडीओ समोर येत आहेत. या घटनेनंतर विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे बोललं जात होतं. मात्र आता एक नवीन अपडेट समोर आली आहे. अहमदाबाद विमान अपघातात एक प्रवाशी जिवंत बचावल्याचे समोर आले आहे.

पोलीस आयुक्त जीएस मलिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमदाबादमध्ये झालेल्या भीषण विमान अपघातातून एक व्यक्ती जिवंत बचावली आहे. रमेश विश्वकुमार असे या व्यक्तीचे नाव असून तो 11A या सीट नंबरवर बसला होता. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती गंभीर असून डॉक्टरांची टीम त्याच्यावर सतत लक्ष ठेवून आहे. यामुळे विमानातील अजून काही लोक जिवंत असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या बचावकार्य वेगाने आणि पूर्ण ताकदीने सुरू आहे.

रमेश विश्वकुमार काय म्हणाले?

या अपघातातून बचावलेल्या रमेश विश्वकुमारने नेमकं काय घडलं याबद्दलची सविस्तर माहिती दिली. आमच्या विमानाने उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या तीस सेकंदांत एक मोठा आवाज झाला आणि त्यानंतर विमान कोसळले. मी जेव्हा शुद्धीवर आलो, तेव्हा माझ्या आजूबाजूला अनेक मृतदेह पडले होते. मी खूप घाबरलो होतो. मी उभा राहिलो. सैरावैरा पळू लागलो. माझ्या आजूबाजूला विमानाचे तुकडे विखुरले होते. मला कोणीतरी पकडले आणि रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेले.” असे रमेश विश्वकुमार यांनी सांगितले.

रमेश विश्वकुमार हे ब्रिटीश नागरिक आहेत. ते आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी भारतात आले होते. त्यांचा भाऊ अजय कुमार यांच्यासोबत ते युकेला परतत होते. त्यावेळी हा विमान अपघात झाला.

कोणत्या देशातील किती नागरिक?

दरम्यान एअर इंडियाचे फ्लाइट क्रमांक AI171 या विमानाने 12 जून रोजी दुपारी 1 वाजून 39 मिनिटांनी अहमदाबादहून लंडनला जाण्यासाठी उड्डाण घेतले. या विमानात एकूण २४२ प्रवासी होते. यात 2 पायलट आणि 10 केबिन क्रूचाही समावेश होता. त्यापैकी १६९ भारतीय नागरिक, ५३ ब्रिटिश नागरिक, १ कॅनेडियन नागरिक आणि ७ पोर्तुगीज नागरिक होते अशी माहिती एअर इंडियाने दिली आहे. तसेच प्रवाशांमध्ये ११ लहान मुलं आणि २ नवजात बालकांचाही समावेश होता अशी माहितीही समोर आली आहे.