पळून जाऊन लग्न करताय? पोलीस संरक्षण देणार का? कोर्टाचा हा निकाल वाचाच
Allahabad High Court Decision : पळून जाऊन लग्न करताय, अथवा करण्याचा विचार करत असाल तर मग हा बातमी वाचाच. तुम्ही प्रेम विवाह करून पोलिसांकडून संरक्षण घेण्याचा विचार करत असाल तर कोर्टाचा हा निकाल एकदा वाचाच.

लग्न हा आयुष्यातील मोठा टप्पा असतो. काही घरच्यांच्या मर्जीने लग्नाची गाठ बांधतात. तर काही जण इश्काच्या धुंदीत पळून जाऊन लग्न करतात. काहींना प्रेम विवाहाचे वेड असते. पळून जाऊन लग्न करताय, अथवा करण्याचा विचार करत असाल तर मग हा बातमी वाचाच. तुम्ही प्रेम विवाह करून पोलिसांकडून संरक्षण घेण्याचा विचार करत असाल तर कोर्टाचा हा निकाल एकदा वाचाच.
कोर्टाचा निकाल काय?
अलाहाबाद हायकोर्टाने एका याचिकेत महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. आई-वडिलांच्या मर्जीविरोधात, त्यांच्या पसंतीविरोधात लग्न करणारे प्रेमी जोडपे पोलीस सुरक्षेचा दावा करू शकत नाही, असा निकाल कोर्टाने दिला आहे. जोपर्यंत त्यांचे जीविताला आणि स्वातंत्र्याला धोका होत नाही, तोपर्यंत ते पोलीस सुरक्षेसाठी दावा करू शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
तरच पोलीस संरक्षणाचा दावा
न्यायमूर्ती सौरभ श्रीवास्तव यांच्या खंडपीठासमोर प्रकरणात सुनावणी झाली. एका जोडप्याने पोलीस संरक्षण मिळावे यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांनी पोलीस संरक्षण देण्याची विनंती याचिकेत केली होती. सुनावणीअंती न्यायालयाने स्वतःच्या इच्छेने लग्न करणाऱ्या जोडप्यांना पोलीस संरक्षणाचा अधिकार नसल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या जीविताला अथवा त्यांच्या स्वातंत्र्याला जर धोका असेल तरच ते पोलीस संरक्षण मागू शकतात असे हायकोर्टाने निकालात स्पष्ट केले.
मग समाजाचा सामना करा
योग्य प्रकरणात प्रेमी जोडपे न्यायालयात पोलीस संरक्षणासाठी याचिका दाखल करू शकतात. पण त्यांच्या समोर जर कोणत्याही प्रकारचा धोका नसेल. त्यांच्या कुटुंबाकडून जीविताला धोका नसेल तर प्रेम विवाह करणाऱ्या दोघांनी एकमेकांचा आधार व्हायला हवे. तरुण आणि तरुणीने एकमेकांना मदत करायला हवी. या दोघांनी समाजाचा सामना करायला हवा. याप्रकरणात याचिकाकर्त्यांचे जबाब, कुटुंबाची मते आणि त्याविषयीची कागदपत्रे कोर्टात सादर करण्यात आली होती. त्यात या प्रेमी जोडप्याला कुठलाही धोका नसल्याचे समोर आले. त्यामुळे न्यायालयाने योग्य तो निकाल देत ही याचिका निकाली काढली.
